Udaipur Murder Case : नुपूर शर्माबाबत आरएसएसचे मोठे वक्तव्य, उदयपूरची हत्या चिथावणीचे नव्हे, तर तालिबानी विचारसरणीचा परिणाम होती


जयपूर : मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. देशात जे काही घडत आहे, त्याला नुपूर शर्मा जबाबदार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उदयपूर हत्याकांडाचे वर्णन ‘तालिबानी घटना’ असे केले आहे. ही घटना चिथावणीची प्रतिक्रिया नसून एका विशिष्ट मानसिकतेचा आणि विश्वासाचा परिणाम असल्याचे आरएसएसने म्हटले आहे.

उदयपूरमध्ये जे घडले, ते कोणत्याही चिथावणीविना जगभर घडत असल्याचे आरएसएस प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले. कुठेतरी हमास, इस्लामिक स्टेट, तालिबान आहे. आमच्या देशात सिमी आणि पीएफआय आहेत. चिथावणी दिल्याने असे झालेले नाही. जर कोणाचा असा विश्वास असेल की हे चिथावणीमुळे झाले असेल, तर त्याला अधिक वाचण्याची आवश्यकता आहे. तालिबानची या घटनेमागची मानसिकता आणि श्रद्धा समजून घेणे गरजेचे आहे. भारत इतरांना मदत करण्यासाठी आपली शक्ती वापरतो.

ते म्हणाले की एखाद्या चांगल्या व्यक्तीने देखील इतरांना मदत करण्यासाठी आणि शांतता बिघडवणाऱ्यांना रोखण्यासाठी सक्षम असले पाहिजे. अशा समस्यांना सामोरे जाण्यासाठी घटनात्मक मार्ग आहेत. कोणाला काही अडचण असेल, तर ती घटनात्मक पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करावा. ‘द तालिबान: वॉर अँड रिलिजन इन अफगाणिस्तान’ आणि ‘भारताचा विसरलेला इतिहास’ या पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात आंबेकर यांनी या गोष्टी सांगितल्या.

तालिबानला समजून घेण्यावर भर
आरएसएस प्रचार प्रमुखांनी तालिबानला समजून घेण्यावर भर दिला. धार्मिक कट्टरवादाच्या नावाखाली फाळणीचा सामना करणाऱ्या देशाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे ते म्हणाले. त्याचा भारताशी काही संबंध आहे का, याचा शोध घेणे आवश्यक आहे. असा कोणताही दहशतवादी घटक भारतात प्रवेश करत नाही का? भारतात घडणाऱ्या घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का? जे अशा मूलतत्त्ववादी विचारसरणीचे समर्थन करतात ते राजकीय की स्वार्थी कारणांसाठी? कारण काहीही असले तरी ते शोधले पाहिजे.

आरोप – दडपण्यात आले आरएसएसचे योगदान
स्वातंत्र्यानंतर जे काही झाले, त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान पूर्णपणे दडपले गेले, असा आरोप सुनील आंबेकर यांनी केला. 12 जुलै 1922 रोजी डॉ. हेडगेवार यांची वर्षभरानंतर तुरुंगातून सुटका झाली. त्यांच्या स्वागतासाठी नागपुरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोतीलाल नाहरू आणि सी राजगोपालाचारी आले आणि त्यांनी कार्यक्रमात भाषण केले. हे त्यांनी देशाला सांगायला हवे होते.

भारताचा इतिहास जाणून घेणे महत्वाचे
ते पुढे म्हणाले की व्ही डी सावरकर, नेताजी सुभाष बोस, आदिवासी नेते बिरसा मुंडा आणि अंदमान निकोबारच्या तुरुंगात असलेल्या मणिपूरच्या राजाबद्दल लोकांना माहिती पाहिजे. तेव्हाच लोकांना कळेल की इंग्रजांनी आपल्याला देश म्हणून संघटित केले नाही. स्वातंत्र्यापूर्वीही भारत एक होता. म्हणूनच इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. धर्मनिरपेक्षतेचा समावेश घटनेत कसा करण्यात आला? नव्या पिढीला याची जाणीव करून द्यावी लागेल.

सुनील आंबेकर म्हणाले की, फाळणी का झाली हे नव्या पिढीला कळायला हवे. यावर चर्चा होऊ नये असे काहींना वाटते. आपल्या देशावर पुन्हा हल्ला होणार नाही किंवा एकटेपणा आणि दहशतवादाच्या चर्चा करणाऱ्या शक्तींनी मूळ धरले जाणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.