२ जुलै- जागतिक युएफओ दिवस

उडत्या तबकड्या प्रत्यक्ष आहेत का, पृथ्वीबाहेर अन्य ग्रहावर जीवन आहे काय याचा शोध प्राचीन काळापासून घेतला जात आहे. उडत्या तबकड्या दिसल्याच्या बातम्या अनेकदा येतात मात्र त्याची अधिकृत पुष्टी अद्यापि कुणीच केलेली नाही. जगभरातून विविध ठिकाणाहून अजब वस्तू आकाशातून वेगाने जाताना पाहिल्याचे दावे सतत केले जातात. चित्रपट, कादंबऱ्या लिहिणाऱ्याना यामुळे अनेक नवे विषय मिळतात. या सर्व पार्श्वभूमीवर युएफओ म्हणजेच उडत्या तबकड्या साठी २ जुलै हा जागतिक युएफओ दिवस म्हणून साजरा केला जातो.

हा दिवस साजरा करण्याचा उद्देश युएफओ विषयी जनजागृती करणे हा आहे. युएफओचा संबंध एलियन्स किंवा परग्रहवासी यांच्याशी आहे. हे एलियन्स माणसापेक्षा अधिक बुद्धिमान असावेत असे दावे केले जातात. युएफओ जागतिक दिवसाच्या निमित्ताने युएफओ पाहिल्याचे दावे करणाऱ्या सर्वाना एक संधी मिळते, ज्यात ते आपले शोध, अनुभव, कल्पना जगभरात शेअर करू शकतात.

गेल्या एक वर्षात मात्र परिस्थिती बदलली आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने युएफओ संदर्भात एक स्वतंत्र टीम तयार केली आहे. अमेरिकन इंटेलीजन्स रिपोर्ट नुसार गतवर्षात युएफओ पाहिल्याच्या १४४ घटना उघड झाल्या आहेत. प्रथमच त्यामुळे अमेरिकन सरकार आणि नासाचे वैज्ञानिक युएफओ बद्दल उघड चर्चा करू लागले आहेत. अमेरिकन सरकारने हा विषय गंभीरपणे घेतला आहे पण त्यांच्या कडे या संदर्भात अजून पुरेसा डेटा गोळा झालेला नाही.

जगभरात कुठेही अश्या घटना घडताना दिसल्या तर जनता जागृत असावी आणि या घटना तातडीने  नोंदविल्या जाव्यात या साठी प्रयत्न केले जात आहेत. काही देशात हा दिवस २४ जून रोजी साजरा होतो. पण २ जुलै रोजी हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे २ जुलै १९४७ मध्ये न्यू मेक्सिको येथे अमेरिकन वायू दलाचा एक बलून नष्ट झाला आणि त्यामागे युएफओची धडक या बलूनला बसली असा संशय होता.