या महापौरांनी मगरीशी केला विवाह

मेक्सिको सॅन पेद्रो हुअमेलुलाचे महापौर  ह्युगो सध्या सोशल मिडीयावर खूपच चर्चेत आले आहेत आणि त्यामागचे कारण आहे त्यांनी शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये पारंपारिक रितीरिवाजानुसार एका मगरीशी केलेला विवाह. होय, आपण वाचतो आहे ते अगदी बरोबर आहे. या महाशयांनी एका मगरीला आपली पत्नी म्हणून स्वीकारले आहे. या विवाहाला खूप गर्दी झाली होती आणि सर्व विवाह विधी रीतीनुसार पार पाडले गेले. यामागचा हेतू पर्यावरण, माणूस आणि प्राणी यांच्यातील नाती जपणे हा आहे.

अर्थात मेक्सिको मध्ये मगरीशी विवाह करणे ही नवलाची नाही तर रुळलेली प्रथा आहे. या मुळे ईश्वराकडे व्यक्त केलेली इच्छा फलद्रूप होते अशी भावना आहे. सर्व सामान्यपणे या इच्छा म्हणजे भरपूर पाउस पडू दे, मासेमारांना भरपूर मासळी मिळू दे अश्या स्वरूपाच्या असतात. मगरीशी लग्न हे येथे प्राचीन परंपरा आहे. १७८९ पासून ही प्रथा सुरु आहे. अश्या विवाहासाठी अनेक विधी केले जातात.

या विधी मध्ये प्रथम मगरीचे नामकरण केले जाते. मग लग्नाची तारीख ठरविली जाते आणि पाहुणे, नातेवाईक यांना रीतसर आमंत्रणे दिली जातात. सर्व उपस्थितांच्या समक्ष हा विवाह होतो. यामुळे त्या त्या प्रांतातील जनता आणि प्रांताची सुद्धा भरभराट होते असे मानले जाते.