Aryan Khan Passport : शाहरुख खानच्या मुलाची कोर्टाकडे पासपोर्ट परत करण्याची मागणी


मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन, ज्याला गेल्या वर्षीच्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कडून क्लीन चिट मिळाली आहे, त्याने गुरुवारी विशेष एनडीपीएस कोर्टासमोर आपला पासपोर्ट परत करण्यासाठी याचिका दाखल केली.

न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आणि या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 13 जुलैची तारीख निश्चित केली. आर्यन खानला गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीला NCB ने हाय-प्रोफाइल ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती, परंतु तपास संस्थेने मे महिन्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपी म्हणून त्याचे नाव दिले नाही.

जामीनाच्या अटींवर कोर्टात जमा केला होता पासपोर्ट
NCB ने आर्यन खान आणि इतर पाच जणांना पुरेशा पुराव्याअभावी सोडून दिले होते. आर्यन खानने जामीनाच्या अटींनुसार कोर्टात पासपोर्ट सादर केला होता. गुरुवारी त्याने त्याच्या वकिलांच्या मार्फत विशेष कोर्टात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये त्याचे नाव नसलेल्या आरोपपत्राचा हवाला देत पासपोर्ट परत करण्याची मागणी केली होती.

24 वर्षीय आर्यनला एनसीबीने गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या किनारपट्टीवर गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर अटक केली होती. मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर करण्यापूर्वी आर्यन खानने 20 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात काढले होते.