गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, आता ग्राहकांना मोजावे लागणार इतके पैसे


नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरच्या किमतीत 198 रुपयांनी मोठी घट झाली आहे. याची अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरु झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही, म्हणजेच ते कायम राहतील. नवीन दर आज 1 जुलै 2022 पासून लागू झाले आहेत.

जिथे ग्राहकांना पूर्वी व्यावसायिक सिलिंडरसाठी 2,219 रुपये मोजावे लागत होते, तिथे आता त्यांना यासाठी 198 रुपये कमी मोजावे लागणार आहेत. आता 19 किलोच्या सिलेंडरसाठी ग्राहकांना 2,021 रुपये मोजावे लागणार आहेत. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी काही मोठे बदल दिसून येतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. हे बदल एकतर ओझे वाढवतात किंवा थोडा दिलासा देतात.

यापूर्वी 1 जून रोजीही गॅस कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली होती. त्यानंतर कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर 135 रुपयांनी कपात केली होती. त्यानंतर दिल्लीत 19 किलो गॅस सिलिंडरची किंमत 2219 रुपयांवर गेली होती.