राष्ट्रपती निवडणुकीसाठी ८७ उमेदवार

निवडणूक आयोगाने देशात राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा केल्यानंतर या निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. भाजप प्रणीत द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मात्र त्यांच्या शिवाय अन्य ८७ नागरिकांनी सुद्धा राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल केले असल्याचे समजते. गुरुवारी रिंगणातील उमदेवारांच्या अर्जांची अंतिम छाननी होणार असल्याचे जाहीर केले गेले होते.

या वर्षी निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना ५० प्रस्तावक आणि ५० अनुमोदक देणे बंधनकारक केले होते शिवाय ते निवडणूक मंडळाचे सदस्य असणे आवश्यक होते. उमेदवाराने १५ हजार रुपये रोख किंवा आरबीआय सरकारी कोषात ही रक्कम भरल्याची पावती देणे बंधनकारक होते अन्यथा अर्ज फेटाळला जाणार होता. १८ जुलै रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी ११५ अर्ज आले होते पण त्यातील २८ अर्ज मतदार यादीत नाव नसल्याने अगोदरच रद्द केले गेले आहेत.

या वर्षी देशाच्या विविध भागातील सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले असून त्यात मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारे एक उमेदवार आहेत तसेच दिल्ली मधील एक प्राध्यापक सुद्धा आहेत. किमान ३५ वर्षे वयाची आणि लोकसभेचा खासदार बनण्यास योग्य अशी कोणीही व्यक्ती या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करू शकते.