नीरज चोप्राची पुन्हा विक्रमी भालाफेक
टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये भालाफेकीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राची नवनवी रेकॉर्ड बनविण्याची परंपरा सुरु राहिली आहे. स्वीडनच्या डायमंड लीग स्टॉकहोम सिझन मध्ये त्याने ८९.९४ मीटर भालाफेक करून स्वतःचेच नवे रेकॉर्ड नोंदविले आहे. १५ दिवसांपूर्वी २४ वर्षीय नीरजने फिनलंड येथील पावो नुरमी गेम्स मध्ये ८९.३० मीटर भालाफेक करून नॅशनल रेकॉर्ड कायम केले होते. नीरजने आता दुसऱ्या वेळी ८९ मीटर पेक्षा अधिक भालाफेकीचा मार्क गाठला आहे.
टोक्यो ऑलिम्पिक मध्ये नीरजने ८८.०७ मीटर भालाफेक करून गोल्ड मेडल मिळविले होते. नीरजची ही नवी कामगिरी या महिन्यात होत असलेल्या वर्ल्ड चँपियनशिप मध्ये त्यांच्यासाठी टॉनिकचे काम करेल असे म्हटले जात आहे. अमेरिकेत होत असलेल्या या वर्ल्ड चँपियनशिप मध्ये टोक्यो ऑलिम्पिक मधील तीन मेडलीस्ट मैदानात आहेत. नीरज आत्तापर्यंत ७ डायमंड लीग खेळला असून त्यात २०१७ मध्ये तीन आणि २०१८ मध्ये चार लीग आहेत. २०१८ मध्ये त्याला मेडल मिळालेले नव्हते.