धोनी गुडघेदुखीने त्रस्त, वैदू कडून घेतोय उपचार
टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी उर्फ माही आयपीएल संपल्यापासून प्रसिद्धीच्या झोतापासून दूर होता मात्र आता नव्याच कारणाने तो पुन्हा चर्चेत आला आहे. गेले काही दिवस माही गुडघेदुखीच्या त्रासाने त्रस्त आहे. मात्र रांची पासून साधारण ७० किमी दूर असलेल्या एका छोट्या गावात झाडाखाली बसून रुग्णावर उपचार करणाऱ्या एका वैद्यांकडून उपचार करून घेण्यास त्याने प्राधान्य दिले असल्याचे समजते. वनौषधी आणि जंगली जडीबुटीचे उपचार माही घेत असून त्याने या दुखण्यासाठी पारंपारिक उपचारांना प्राधान्य दिले आहे.
वैद्य बंधनसिंग खरवार असे या वैद्यांचे नाव आहे. त्यांना माही त्यांच्या कडे उपचाराला आला तेव्हा हा कोण आहे आणि किती प्रसिध्द आहे याची जराही कल्पना नव्हती. मात्र गावातील लोकांनी धोनीला ओळखले आणि त्याच्या बरोबर फोटो काढायला सुरवात केली तेव्हा त्यांना आपण कुणावर उपचार करतोय ते कळले. ते म्हणाले, ‘अन्य रुग्णांप्रमाणेच मी धोनी कडून सुद्धा डोसचे ४० रुपये इतकेच पैसे घेतो. गेली २८ वर्षे ते याच झाडाखाली तंबू लावून रुग्णांवर उपचार करत आहेत. अनेक रोगांवर येथे उपचार होतात.’
गेला महिनाभर दर चार दिवसांनी माही येथे औषध घेण्यासाठी येतो. हाडांच्या दुखण्यावर जे औषध दिले जाते ते घरी नेण्याची परवानगी नाही. माहीच्या आईवडिलांनी याच वैद्यांकडे उपचार घेतले आणि त्यांना दुखण्यात चांगलाच फरक जाणवला म्हणून धोनी येथे येत असल्याचे समजते. येथे येताना माही एखाद्या सामान्य रुग्णाप्रमाणेच येतो. पण आता त्याला ओळखून गर्दी होऊ लागल्याने तो आला की गाडीतच बसून राहतो, औषध घेतो आणि घरी परततो असे समजते.