एलोन मस्क यांनी एकाचवेळी २०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ

जगातील सर्वात श्रीमंत एलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीत सध्या सर्व आलबेल नाही यांचे अनेक संकेत मिळत आहेत. भारतात प्रवेश करण्याचे टेस्लाचे प्रयत्न स्वप्नवत भासत असतानाचा टेस्लाने अनेक ठिकाणची ऑफिस बंद करायला सुरवात केली आहे. ताज्या रिपोर्ट नुसार टेस्ला मधील ऑटोपायलट टीम मधील २०० कर्मचाऱ्यांना नोकरी वरून कमी केल्याच्या नोटीसा दिल्या गेल्या आहेत. या संदर्भात ब्ल्युमबर्गचा रिपोर्ट आला आहे.

त्यानुसार कॅलिफोर्निया मधील एक ऑफिस टेस्ला ने बंद केले आहे. जे कर्मचारी कामावर आहेत त्यांना तासाच्या हिशोबाने पगार दिले जात आहेत. गेल्या आठवड्यात मस्क यांनी १० टक्के कर्मचारी कपात योजनेची रूपरेषा तयार केली होती. प्रतीतास वेतनावर काम करणारे कर्मचारी वाढविणे आणि कर्मचारी कमी करणे असे या योजनेचे स्वरूप होते. यामुळे एकूण कर्मचारी संख्या ३.५ टक्के कमी होणार आहे. टेस्ला मध्ये सध्या १ लाख कर्मचारी आहेत असे समजते.

टेस्लाने भारतात कार विक्री करण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालविले असून भारतातील कार विक्रीवर आयात कर कमी करावा अशी मागणी लावून धरली आहे. मात्र भारत सरकारने अगोदर देशात उत्पादन प्रकल्प सुरु करावा अशी अट कायम ठेवली आहे. एलोन मस्क यांनी ज्या देशात विक्री आणि सेवा देण्यासाठी परवानगी मिळणार नाही त्या कुठल्याच देशात उत्पादन प्रकल्प सुरु करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.