रिलायंस पेट्रोलियम आणि रिफायनरी अनंत अंबानीच्या वाट्याला येणार
देशातील बडे उद्योजक मुकेश अंबानी यांनी वयाची ६५ वर्षे पूर्ण केल्यावर लगेचच त्यांच्या उद्योगसाम्राज्याची धुरा उत्तराधिकाऱ्याकडे सोपविणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी त्यांच्या उद्योगांची व्यवस्था लावण्याचे काम हाती घेतले असून मोठा मुलगा आकाश यांच्या कडे नुकतीच रिलायंस जिओची जबाबदारी सोपविली गेली आहे. मुकेश यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. त्यामुळे बाकीच्या दोघांना आता कोणती जबाबदारी मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान मुकेश यांनी कन्या इशा हिच्याकडे रिलायंस रिटेलची धुरा देण्याची तयारी केली असल्याचे समजते. आणि छोटा मुलगा अनंत याच्यासाठी मुकेश यांनी खास योजना तयार केली आहे. या उद्योगसमूहाचा तिसरा मोठा हिस्सा पेट्रोकेमिकल आणि रिफायनरी तसेच ग्रीन एनर्जी सेक्टर अनंत यांच्याकडे सोपविला जाणार आहे.रिलायंस डिजिटल आणि रिटेल या पूर्वीच पूर्ण स्वामित्व असलेल्या रिलायंसच्या सबसिडरी कंपन्या आहेत. मात्र पेट्रोकेमिकल आणि रीफायनरी तसेच ग्रीन एनर्जी पेरेंट कंपनी मध्ये अंतर्भूत आहेत. या तिन्ही कंपन्यांचे मूल्य समान असल्याचे समजते.
मुकेश यांनी त्यांच्या पिढीत झालेल्या संपत्ती वादातून मोठा धडा घेतला असून आपल्या हयातीतच उद्योगाची वाटणी करण्याचा निर्णय घेतला होता.२००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश आणि अनिल या दोन भावांमध्ये वर्चस्वावरून प्रचंड वाद झाले आणि त्याकडे केवळ देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष वेधले गेले होते. अखेर आई कोकिला बेन यांच्या मध्यस्तीने या वादावर तोडगा काढला गेला होता. यामुळे मुकेश यांनी वेळीच कोणत्या उद्योगाचा कोण उत्तराधिकारी याविषयी निर्णय घेतला असे सांगितले जात आहे.