देवेंद्र फडणवीस १ जुलै रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

राज्यातील भाजपा नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज झाले असल्याचे समजते. देवेंद्र फडणवीस १ जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त आले असून आज सकाळी ११ वा. पुढची रणनीती ठरविण्यासाठी फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर एक बैठक बोलावली गेली आहे. दरम्यान मिडिया रिपोर्ट नुसार शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपला पाठिंबा देणार असल्याचे  जाहीर केले आहे.

महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयाकडून बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात करण्यात आलेल्या याचिकेकडून दिलासा मिळाला नाही. त्यामुळे बहुमताला सामोरे जाण्याअगोदरच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री पदाचा आणि विधान परिषदेचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता नवीन मुख्यमंत्री निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र शिंदे गट कोणत्या नावाने  स्वतःचा गट बनविणार हे अगोदर ठरवावे लागणार आहे. कारण त्याशिवाय ते राज्यपालांना भाजपला पाठींबा देत असल्याचे पत्र देऊ शकणार नाहीत.

मुंबईच्या ताज प्रेसिडेंट मध्ये रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना गुरुवारी सर्व माहिती देऊ असे सांगितले आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील आणि अन्य नेते उपस्थित होते. दरम्यान गोवा येथे दाखल झालेल्या एकनाथ शिंदे गटाची बैठक सुद्धा झाली आहे असे समजते. सध्या विधानसभेत भाजपचे १०६ आमदार असून एकनाथ शिंदे गट आणि अपक्ष यांच्या पाठींब्यावर भाजप सरकार स्थापनेचा दावा करू शकणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले,’ महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना आणि लोकशाहीचा हा विजय आहे. मात्र ही वेळ जल्लोष करण्याची नाही.’