एकनाथ शिंदे गट थेट शपथविधीसाठीच मुंबईत येणार
महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर कोसळले असतानाच गोव्यात दाखल झालेल्या शिवसेना बंडखोर नेत्यांचा गट आज मुंबईत येणार नसल्याचे समजते. एएनआयच्या बातमीनुसार भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाला सध्या मुंबई मध्ये येऊ नका असा निरोप दिला आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने आता बहुमत चाचणी साठी मतदान आवश्यक राहिलेले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला तातडीने मुंबईत येण्याची आवश्यकता नाही.
मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाने आठ दिवस गोहाटी मध्ये मुक्काम केल्यावर आता गोव्यात हॉटेल ताज मध्ये मुक्काम केला आहे. २९ तारखेला सायंकाळी सहाच्या सुमारास हा गट येथे दाखल झाला. त्यांच्यासाठी या हॉटेल मध्ये ७० रूम्स बुक केल्या गेल्या आहेत. हॉटेल भोवती कडक सुरक्षा तैनात केली गेली आहे. गोहाटी मधून स्पेशल विमानाने हा गट गोव्यात दाखल झाला.
मुंबईच्या ताज प्रेसिडेन्सी मध्ये १२३ खोल्या बुक केल्या गेल्या असून येथेच एकनाथ शिंदे गटाचा मुक्काम असेल असे सांगितले जात आहे. मात्र शपथविधी बाबत नक्की निर्णय होईपर्यंत शिंदे गटाने मुंबईत येऊ नये असे आवाहन त्यांना केले गेल्याचे सांगितले जात आहे.