आता आंब्यापासून बनणार वाईन
उत्तर प्रदेश सरकार आंब्यापासून वाईन बनविण्याच्या तयारीला लागल्याचे समजते. काशी हिंदू विश्वविद्यापीठातील संशोधकांनी गेली अनेक वर्षे केलेल्या संशोधनातून लंगडा आणि दशहरा या दोन जातींच्या आंब्यांपासून वाईन तयार करण्यात यश मिळविले आहे. ही वाईन विद्यापीठाच्या एथिकल कमिटी कडे मंजुरीसाठी पाठविली गेली असून तेथून मंजुरी आल्यावर नंतर या वाईनवर आणखी काही चाचण्या घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्याचे उत्पादन सुरु होणार आहे.
या वाईनची खासियत म्हणजे यात मोठ्या प्रमाणावर अँटी ऑक्सिडंटस आणि पॉलीफीनॉल असून यात हृदयरोग, कॅन्सर आणि त्वचा विकारांविरोधात लढण्याची सक्षमता आहे. शिवाय वाईन उत्पादनाचा थेट फायदा शेतकऱ्यांची कमाई वाढण्यात होणार आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर फुड सायन्स अँड टेक्नोलॉजीचे प्रोफेसर अभिषेक दत्त त्रिपाठी यांनी या विषयी अधिक माहिती दिली.
त्रिपाठी म्हणाले, उत्तर प्रदेशात आंब्याचे पिक प्रचंड प्रमाणात आले तर त्यातील ३० ते ४० टक्के आंबा खराब होऊन जातो. त्यामुळे द्राक्षांप्रमाणे आंब्यापासून वाईन बनविता येईल का, या विषयावर दीर्घ काळ संशोधन सुरु होते. त्यात यश आले आहे. या वाईन मध्ये हेल्थ टॉनिक प्रमाणे अनेक गुण आहेत. या वाईन मध्ये ९ ते १२ टक्के अल्कोहोल प्रमाण आहे पण हे द्राक्षाच्या वाईन पेक्षा थोडे कमी आहे. या प्रयोगात बेगमपल्ली, नीलम, तोतापुरी, दशेरा आणि लंगडा अश्या जातींच्या आंब्यावर संशोधन केले गेले त्यात वरील दोन जातीच्या आंब्यापासून बनलेली वाईन अधिक गुणकारी असल्याचे दिसून आले. ही वाईन पिणार्यांचे आरोग्य चांगले राहील. अनेक कंपन्यांनी या संदर्भात आमच्याशी संपर्क साधला आहे. ही वाईन बनविण्यास फार खर्च येत नाही. त्यामुळे बाजारात या वाईनची ६५० एमएलची बाटली २०० रुपयात उपलब्ध होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.