IND vs ENG : जसप्रीत बुमराहला कर्णधारपद मिळणे जवळपास निश्चित, कोरोनाशी झुंजणारा रोहित खेळणार नाही एजबॅस्टन कसोटी


लंडन – एजबॅस्टन कसोटीच्या दोन दिवस आधी मोठी बातमी समोर आली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघाला मोठा धक्का बसू शकतो. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की कर्णधार रोहित शर्मा एजबॅस्टन कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी जसप्रीत बुमराह त्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुमराहला ही माहिती देण्यात आली आहे.

लेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली. तो अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. अशा परिस्थितीत टीम इंडिया नवा कर्णधार बुमराहच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरू शकते. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, संघाच्या बैठकीत बुमराहला कर्णधारपदाची माहिती देण्यात आली आहे.

असे झाल्यास 35 वर्षीय बुमराह कपिल देवनंतर टीम इंडियाचा कर्णधार करणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरेल. मार्च 1987 मध्ये कपिल देव यांच्यानंतर एकाही वेगवान गोलंदाजाने कसोटीत भारताचे नेतृत्व केलेले नाही. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेदरम्यान बुमराहला भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून बढती देण्यात आली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत बुमराहने संधी मिळाल्यास भारताचे कर्णधारपद स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

पंत आणि कोहलीच्या नावाचीही चर्चा होती
बुमराहशिवाय अन्य दोन खेळाडूंची नावे कर्णधारपदासाठी समोर आली होती. यामध्ये ऋषभ पंत आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. पंतने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व केले. मात्र, विराट कोहलीच्या चाहत्यांना या सामन्यात विराट कोहलीलाच कर्णधारपद द्यावे, अशी इच्छा होती. या मालिकेतील पहिले चार सामने विराटच्या नेतृत्वाखाली खेळले गेले.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराट कोहलीने यावर्षी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता बुमराह इंग्लंडविरुद्ध कर्णधारपद भूषवताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. गेल्या वर्षी, भारतीय संघात कोरोनाची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना पुढे ढकलण्यात आला आणि त्याचे वेळापत्रक बदलण्यात आले. आता खेळला जाणारा हा पाचवा कसोटी सामना आहे.