भाजपचे माजी प्रवक्ते नवीन जिंदाल यांना जिवे मारण्याच्या धमक्या, ईमेलवर पाठवला उदयपूर घटनेचा व्हिडिओ


नवी दिल्ली – उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपचे माजी प्रवक्ते नवीन जिंदाल यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यांना ईमेलद्वारे धमकी देण्यात आली असून, उदयपूरच्या घटनेप्रमाणेच त्यांचा शिरच्छेद करण्याचेही ईमेलमध्ये लिहिले आहे.

स्वत: नवीन जिंदाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची पुष्टी केली आहे. आज सकाळी 6.43 च्या सुमारास त्यांना तीन ईमेल पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या मेल्समध्ये कन्हैया लालचा गळा कापल्याचा व्हिडिओ जोडण्यात आला आहे. नवीन जिंदाल म्हणाले की, ईमेलमध्ये अशीच धमकी देण्यात आली आहे की, तुझा आणि तुझ्या कुटुंबाचाही अशाच प्रकारे शिरच्छेद केला जाईल. याप्रकरणी नवीन जिंदाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.