पहिल्या स्वदेशी mRNA करोना लसीला मंजुरी

भारतात विकसित करण्यात आलेल्या पहिल्या स्वदेशी mRNA करोना प्रतीबंधक लसीला आपदकालीन वापरासाठी देशात मंजुरी दिली गेली आहे. पुणे येथील जेनोवा बायोफार्मा या कंपनीने ही लस विकसित केली असून १८ वर्षांवरील नागरिकांना ती देता येणार आहे. GEM COVAC – 19 ही आरोग्य रक्षण विभागासाठी गेम चेंजर ड्रग ठरेल असा दावा केला जात आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ने पुण्याच्याच सिरम इन्स्टीटयूटने विकसित केलेल्या कोवोवॅक्स या लसीलाही मंजुरी दिली असून ही लस ७ ते ११ वयोगटातील मुलांना देता येणार आहे.

mRNA अन्य लसी जश्या शून्य तापमानावर स्टोअर कराव्या लागतात, त्या तुलनेत २ ते ८ डिग्री तापमानात स्टोअर करता येते. त्यामुळे तिची वाहतूक सुलभ होते. कंपनीचे सीईओ डॉ. संजय सिंह म्हणाले या लसीचे दोन डोस घ्यावे लागतील आणि २८ दिवसांच्या अंतराने दिले जातील. गेल्या महिन्यात या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या झाल्या असून आत्तापर्यंत ४ हजार लोकांवर तिचे परीक्षण केले गेले आहे. ही लस पेशीच्या केंद्रात घुसत नाही आणि त्यामुळे डीएनए बदल होत नाही असे त्यांनी सांगितले.