जपानी पंतप्रधान फुमियो यांना मोदींकडून खास गिफ्ट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ७ बैठकीसाठी दोन दिवस जर्मनीच्या दौऱ्यावर गेले होते. मोदी यावेळीही प्रथेप्रमाणे सर्व राष्ट्रप्रमुखांसाठी खास गिफ्ट घेऊन गेले होते. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना मोदी यांनी जगप्रसिध्द काळ्या मातीची खास भांडी गिफ्ट केली आहेत. उत्तरप्रदेशच्या आजमगढ मधील निजामाबाद येथे ही खास पॉटरी बनविली जाते मात्र त्याला म्हणावा तसा बाजार अजून मिळालेला नाही. देशात या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण धरोहर विकास भारतीय ट्रस्ट खास प्रयत्न करत आहे.

या ब्लॅक सॉईल भांड्यांची उत्पत्ती मूळ गुजराथच्या कच्छ मधील आहे. औरंगजेबाच्या मुगल शासन काळात या भागातील काही कुंभार निजामाबाद येथे गेले आणि तेथेच स्थायिक झाले. बिद्री वर्कच्या प्रेरणेतून ही भांडी बनविली जातात. मातीच्या भांड्यांवर चांदीच्या तारेने कलाकुसर केली जाते. ही प्रक्रिया मोठी क्लिष्ट आणि अतिशय कुशलतेने करावी लागते.

यात प्रथम विविध आकाराची मातीची भांडी भट्टी मध्ये भाजली जातात. त्यानंतर वनस्पतीच्या पुडीने धुतली जातात. मोहरीच्या तेलाने पॉलिश केले जाते. अतिशय नाजूक डिझाईन खाचे करून बनविली जातात आणि ही भांडी पुन्हा भाजली जातात. मग चमकदार काळा रंग आला कि तेल लावून पुन्हा भट्टीत भाजली जातात आणि मग पारा आणि जस्त पावडर, चांदीची पावडर वापरून डिझाईन भरले जाते.

या कलेच्या प्रसारासाठी २०१५ पासून ब्लॅक पॉटरी उत्सव भरविला जातो. या कलेला जीआय टॅग दिला गेला आहे त्यामुळे त्याला वेगळी ओळख मिळाली आहे. फ्लॉवरपॉटस, डिशेश, दिवे, चहाची भांडी आणि हिंदू देवदेवताच्या मूर्ती असे अनेक प्रकार यात बनविले जातात.