विम्बल्डनवर करोना आक्रमक

ब्रिटनने कोविड १९ साठी लागू केलेले सर्व नियम शिथिल केले असून आता मास्क वापरण्याचे बंधन सुद्धा राहिलेले नाही. या परिस्थितीत सुरु झालेल्या विम्बल्डन ग्रांडस्लॅम स्पर्धेत मात्र करोना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीचा उपविजेता मारियो बेरेटिनी याने कोविड १९ ची चाचणी सकारात्मक आल्याने या वर्षीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. कोविड मुळे स्पर्धा न खेळणारा तो दुसरा खेळाडू बनला असून यापूर्वी अमेरिकन ओपन २०१४, १७ विम्बल्डन उपविजेता मरीन सिलीच हा सुद्धा करोना संक्रमण झाल्याने स्पर्धेबाहेर झाला आहे. पहिल्या दोन दिवसातच दोन दिग्गज खेळाडूना करोना पुढे हार मानावी लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या फेरीचा सामना खेळण्याच्या काही तास अगोदर ऑल इंग्लंड क्लबने बेरेटिनी याला हटविल्याची घोषणा केली. बेरेटिनी म्हणाला,’ फ्ल्यू सारखी लक्षणे दिसत होती त्यामुळे काही दिवस विलगीकरणात होतो. लक्षणे गंभीर नव्हती तरी टूर्नामेंट मध्ये सामील सर्व लोकांच्या स्वास्थ्यासाठी व सुरक्षेसाठी सकाळी कोविड १९ ची चाचणी केली ती सकारात्मक आली त्यामुळे न खेळण्याचा निर्णय घेतला.

दोन वर्षापूर्वी करोना मुळे विम्बल्डन स्पर्धा रद्द केली गेली होती. गेल्या वर्षी बायोबबल मध्ये स्पर्धा घेतली गेली आणि दर्शकांची संख्या मर्यादित केली गेली होती. या वर्षी इंग्लंड मध्ये लसीकरण सुरु असल्याने करोना नियम मागे घेतले गेले आहेत आणि प्रेक्षक विना मास्क स्टेडीयम मध्ये येत आहेत.