बहुमत  सिध्द करा- ठाकरे सरकारला राज्यपालांचा आदेश,शिंदे गोहाटी मधून येणार

महाराष्ट्रातील राजकारण आता नव्या वळणावर येऊन ठेपले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिध्द करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी ५ वा. विधानसभेची विशेष सभा होणार आहे. राज्यपालांनी आवाजी मतदान घेण्यास परवानगी नाकारली असून उपस्थित आमदारांची संख्या मोजली जावी असेही आदेश दिले आहेत. या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ शुटींग केले जाणार असल्याचे समजते. काही जाणकारांच्या मते उद्धव ठाकरे या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्ली मध्ये गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे पी नद्डा यांची भेट घेतली होती. सायंकाळी मुंबईला परतल्यावर फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह मंगळवारी रात्री राजभवनावर जाऊन राज्यपालांना भेटले आणि त्यांनी उद्धव सरकार अल्पमतात आहे तेव्हा बहुमत सिध्द करण्यास सांगावे असे पत्र राज्यपालांना दिले होते. राजभवनाबाहेर आल्यावर फडणवीस यांनी पत्रकारांना उद्धव सरकार अल्पमतात आहे असे सांगितले होते.

दरम्यान शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि गटनेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सकाळी अन्य आमदारांच्या सोबत कामाख्या मंदिरात जाऊन देवी दर्शन घेतले आणि पूजा केली. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईला परतत आहोत असे पत्रकारांना सांगितले. आता शिंदे एकटे परत येणार कि त्यांच्या सोबत असलेल्या सर्व आमदारांसह येणार याचा खुलासा झालेला नाही. भाजपने त्यांच्या सर्व आमदारांना बुधवारी मुंबईत हजर होण्याचे आदेश दिले आहेत.