नवी दिल्ली – देशात कोरोनाचा संसर्ग अधिक धोकादायक बनत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन केसेसमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज 10 हजारांहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत पुन्हा 11,793 नवीन कोरोना बाधित आढळले आहेत. सोमवारच्या तुलनेत हा आकडा कमी असला, तरी ही आकडेवारी भयावह आहे. सोमवारी देशात 17,073 नवीन रुग्ण आढळले आहते.
कोरोनाची दहशत पुन्हा वाढली, सक्रिय रुग्ण एक लाखाच्या जवळ, तर 27 जणांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखाच्या जवळपास पोहोचली आहे. आज जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 96,700 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.
एकाच दिवसात झाला 27 जणांचा मृत्यू
देशात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही चढ-उतार सुरूच आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाने 27 जणांचा बळी घेतला आहे. तर एका दिवसापूर्वी 21 जणांचा मृत्यू झाला होता. आता देशातील कोरोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या 5,25,047 वर पोहोचली आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, जर कोरोनाचा दैनिक किंवा साप्ताहिक संसर्ग दर पाच टक्के किंवा त्याहून अधिक असेल, तर ही परिस्थिती चिंताजनक मानली जाते. सोमवारी दैनंदिन सकारात्मकता दर 5.62 टक्के नोंदविला गेला, तर साप्ताहिक सकारात्मकता दर 3.39 टक्के नोंदविला गेला.