गुवाहाटी मध्ये लुडो खेळून टाईम पास करताहेत बंडखोर आमदार

महाराष्ट्रातील सरकार संदर्भातला पेच आता सुप्रीम कोर्टात गेल्याने लवकर मिटणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान गेले सहा दिवस गोहाटीच्या रॅडीसन ब्लू हॉटेल मध्ये मुक्कामास असलेले बंडखोर आमदार वेळ घालविण्यासाठी इनडोअर गेम्स खेळत असल्याचे समजते. बुद्धीबळ, लुडो या खेळांचा सुद्धा त्यात समावेश आहे. मिडिया रिपोर्ट नुसार त्यांचे नेते एकनाथ शिंदे या आमदारांशी रोज किमान एक बैठक घेऊन झालेल्या घडामोडी सांगत आहेतच पण या आमदारांना घरच्या सारखे वाटावे म्हणून नुकताच भंडाराचे आमदार नरेंद्र भोन्डेकर यांचा वाढदिवस सुद्धा येथे साजरा केला गेला.

अन्य वेळी दिवसभर कामात व्यस्त असणाऱ्या या आमदारांना सध्या काहीच काम नाही. त्यातून हॉटेल बाहेर पडण्याची त्यांना परवानगी नाही. कुटुंबाशी बोलायला परवानगी आहे मात्र अनावश्यक माहिती बाहेर जाऊ नये म्हणून खोलीबाहेर मोबाईल आणायला परवानगी नाही. नवीन कुणी आमदार गोहाटीमध्ये येऊन या गटात सामील झाला तर त्याचे स्वागत करायला सर्वजण लॉबीमध्ये येतात पण फोटो कुणी काढायचा आणि मिडिया कडे कुणी पाठवायचा याचे नियोजन अगोदरच केले जाते असे समजते.

यातील काही आमदारांच्या निलंबनाबाबत बजावलेल्या नोटीसीला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे मात्र तरीही या अमादारांचे मनोधैर्य कायम राहावे यासाठी नेते एकनाथ शिंदे रोजच्या रोज त्यांना काय काय घडतेय त्याची माहिती देत आहेत. कधी कधी भाजपचे नेते येथे येऊन त्यांच्या भेटी घेत आहेत असेही सांगितले जात आहे. या गटाला आणखी काही दिवस येथेच काढावे लागतील अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.