अमेरिकेत क्रिकेटवेड वाढले, होतेय मोठी गुंतवणूक
अमेरिकेत आता क्रिकेट वेड वाढायला लागल्याचे दिसून येत असून त्यामागे अमेरिकेत स्थायिक झालेले भारतवंशी आहेत असे सांगितले जात आहे. या लोकांकडून क्रिकेटला प्रोत्साहन दिले जात असून अनेक बड्या कंपन्या क्रिकेट साठी च्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात मधून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. अमेरिकन भारतीय आणि अन्य उद्योजक अमेरिकेत क्रिकेट लोकप्रिय व्हावे यासाठी ९६० कोटी म्हणजे १२ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत. अमेरिकन क्रिकेट एन्टरप्रायझेसच्या उपक्रमात मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) ला व्यावसायिक रूप देण्याची योजना बनविली गेली असून त्यासाठी वरील रक्कम वापरली जाणार आहे.
२०२२-२३ मध्ये एमएलसी टी २०चा रोमांच अमेरिकेत आणेल असे सांगितले जात असून त्यात अमेरिकन खेळाडू आणि जगातील अन्य क्रिकेट खेळाडू सहभागी होतील. एसीईचे समीर मेहता आणि विजय श्रीनिवासन म्हणाले शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स बरोबर भागीदारी नंतर वरील रक्कम त्यांना उपलब्ध झाली आहे. त्यात सत्या नडेला, पेटीएमचे विजयशेखर, एडोबीचे शंतनू नारायण, व्होट्स् अपचे माजी प्रमुख नीरज अरोरा अशी अनेक बडी नावे आहेत. क्रिकेट हा जगातील दोन नंबरचा लोकप्रिय खेळ आहे.
या होत असलेल्या गुंतवणुकीतून स्टेडीयम, कोचिंग सेंटर बनविली जात असून त्यातून नवीन पिढीचे खेळाडू तयार केले जातील. आयसीसी ने टेक्सास येथील मुसा स्टेडीयमला मंजुरी दिली आहे. हे अमेरिकेतील दुसरे व जगातील २३ वे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडीयम आहे. सीएटल येथे मेरीमूर क्रिकेट पार्क तयार होत आहे. विश्वकप सह अन्य सर्व प्रकारचे सामने येथे होऊ शकतात.