डब्लिन – भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताच्या नावावर झाला. टीम इंडियाने हा सामना सात गडी राखून जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता भारत ही मालिका गमावू शकत नाही. या सामन्यात हार्दिक पांड्याने प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात हार्दिकने चमकदार कामगिरी केली. त्याच्याशिवाय युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांनीही टी-२० विश्वचषकासाठी आपला दावा मजबूत केला आहे. दीपक हुडाची फलंदाजीही उत्कृष्ट होती.
IND vs IRE Analysis: उमरान मलिक पदार्पणाच्याच सामन्यात फ्लॉप, दीपक हुडाने टी-20 विश्वचषकासाठीचा मजबूत केला दावा
पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली, मात्र पदार्पणाच्या सामन्यात उमरान मलिकला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पावसामुळे सामना 12 षटकांचा करण्यात आला. आणि आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना 108 धावा केल्या. भारताने लक्ष्याचा पाठलाग 10 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात केला.
सामन्याचा टर्निंग पॉइंट
सामन्यापासून डब्लिनमधील हवामान खूपच खराब दिसत होते आणि सामन्यादरम्यान पावसाची शक्यता होती. अशा परिस्थितीत कर्णधार हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. येथून भारतीय संघ सामन्यात पुढे होता. आयर्लंडचा संघ फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा त्यांना 12 षटके खेळायची होती, पण पाऊस पडल्यास ही षटके कमी होतील, हे आयर्लंडच्या फलंदाजांना माहीत होते. अशा परिस्थितीत त्यांनी अधिक धावा करण्याचा प्रयत्न केला आणि लवकरच तीन विकेट गमावल्या.
आठ चेंडूंत सहा धावा केल्यानंतर आयर्लंडच्या संघाने दोन गडी गमावले होते. यानंतर फलंदाजीला आलेल्या हॅरी टेक्टरने चमकदार कामगिरी केली. त्याने 33 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि तीन षटकार निधाले. यामुळे आयर्लंडचा संघ 108 धावांपर्यंत मजल मारू शकला.
लक्ष्याचा पाठलाग करताना दीपक हुडा आणि इशान किशन या जोडीने 15 चेंडूत 30 धावा जोडल्या. इथून भारताचे अर्धे काम झाले, पण पुढच्या दोन चेंडूत दोन विकेट पडल्या आणि संघ अडचणीत आला. यानंतर कर्णधार हार्दिकने 12 चेंडूत 24 धावा करत संघाला विजयाच्या जवळ नेले. हार्दिक पांड्या आणि दीपक हुडा यांच्यात 64 धावांची भागीदारी झाली.
भारतासाठी कसा होता सामना
सकारात्मक पैलू: भारतीय गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये चांगली कामगिरी केली. पहिल्या चार षटकांत आयर्लंडच्या तीन विकेट पडल्या आणि हा संघ केवळ 22 धावा करू शकला. युझवेंद्र चहलने तीन षटकात केवळ 11 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. त्याचवेळी भुवनेश्वर कुमारनेही तीन षटकांत 16 धावा देत ओकची विकेट घेतली. त्याने एक मेडन ओव्हरही टाकली. दीपक हुडाच्या बॅटने चमत्कार केला. त्याने डावाची सलामी दिली आणि भारताला विजय मिळवून दिला. हुडाने 47 (29) धावा केल्या. इशान किशनने 11 चेंडूत 26 तर कर्णधार हार्दिकने 12 चेंडूत 24 धावांची खेळी केली.
कर्णधार म्हणूनही हार्दिक पांड्या सुपरहिट ठरला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने हुशारीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर स्वत:वर विश्वास व्यक्त करत दुसरे षटक केले. दुसऱ्या चेंडूवरही विकेट घेतली. त्याने बॅटने फिनिशरची भूमिकाही बजावली. हे छोटे लक्ष्य होते आणि षटके लहान होती. यामुळे ऋतुराजला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले नाही.
नकारात्मक पैलू : भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल वगळता सर्व भारतीय गोलंदाज खूप महागडे ठरले. आवेश खान 11, अक्षर पटेल 12, हार्दिक 13 आणि उमरान मलिक 14 धावा दिल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उमरानने पहिल्याच षटकात 14 धावा दिल्या. यानंतर हार्दिकने त्याच्याकडे गोलंदाजी केली नाही. सूर्यकुमार यादव फलंदाजीत फार काही करू शकला नाही आणि पहिल्याच चेंडूवर बाद झाला. हार्दिकनेही शानदार फलंदाजी केली, पण तो सामना पूर्ण करू शकला नाही. शेवटी कार्तिकने येऊन सामना संपवला.
आयर्लंडसाठी कसा होता सामना
सकारात्मक पैलू: हॅरी टेक्टरने 33 चेंडूत 64 धावा करत आपला चांगला फॉर्म कायम ठेवला. त्याने सहा चौकार आणि तीन षटकार मारले आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याच्या या शानदार खेळीमुळे आयर्लंडच्या संघाला 108 धावांची मोठी धावसंख्या उभारता आली. गोलंदाजीत मार्क एडेअरने धावा काढल्या, तर क्रेग यंगने दोन महत्त्वाचे बळी घेतले.
नकारात्मक पैलू : संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज पॉल स्टर्लिंग या सामन्यात फ्लॉप ठरला. त्याने अवघ्या चार धावा केल्या. कर्णधार बलबर्नीला खातेही उघडता आले नाही. डेन्ली नऊ चेंडूत आठ धावा काढून बाद झाला. त्यामुळे पॉवरप्लेमध्ये या संघाला तीन गड्यांच्या मोबदल्यात 22 धावाच करता आल्या. गोलंदाजीत जोशुआ लिटलने 14 चेंडूत 16.70 च्या इकॉनॉमी रेटने 39 धावा दिल्या. मॅकब्राईननेही एका षटकात 21 धावा दिल्या.