IND vs ENG : रोहितला संसर्ग झाल्यानंतर त्याच्या जागी बोलावण्यात आलेला मयंक अग्रवाल क्वारंटाइन न होता होणार संघात सामील


नवी दिल्ली – भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी मयंक अग्रवालला इंग्लंडमध्ये पाचारण करण्यात आले आहे. अग्रवाल शुभमन गिलसोबत टीम इंडियासाठी डावाची सुरुवात करू शकतो. भारताचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत त्याचा पर्याय म्हणून मयंक अग्रवालला इंग्लंडमध्ये पाचारण करण्यात आले आहे. मयंकने फ्लाइटमध्ये चढल्यानंतर त्याचा फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये तो बर्मिंगहॅमला जात असल्याचे लिहिले आहे. भारताचे दोन महत्त्वाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. अशा स्थितीत गिल आणि अग्रवाल ही जोडी डावाची सुरुवात करू शकते. मात्र, रोहित कसोटी सामन्यापूर्वी तंदुरुस्त होईल की कसोटी खेळणार नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी 1 जुलैपासून होणार आहे. अशा परिस्थितीत रोहितकडे अजून तीन दिवसांचा अवधी आहे. जर रोहित शर्मा बरा झाला, तर तो भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवेल आणि गिलसोबत डावाची सुरुवातही करेल. त्याचवेळी त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत किंवा विराट कोहली यांना कर्णधार बनवले जाऊ शकते.

क्वारंटाईनमध्ये राहणार नाही मयंक
मयंक अग्रवालला इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार नाही. तो थेट टीम इंडियात सामील होईल आणि सरावाला सुरुवात करेल. मयंकने टीम इंडियासाठी यापूर्वी अनेकदा कसोटीत डावाची सुरुवात केली आहे आणि त्याचा रेकॉर्डही चांगला आहे, पण आयपीएल 2022 मध्ये खराब फॉर्ममुळे अग्रवालला भारतीय संघात संधी देण्यात आली नाही.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी झाला होता तीन खेळाडूंना संसर्ग
भारताचा इंग्लंड दौरा सुरू होण्यापूर्वीच तीन भारतीय खेळाडूंना संसर्ग झाला आहे. सर्वप्रथम रविचंद्रन अश्विनला भारतात संसर्ग झाल्याचे आढळून आले आणि तो संघातील उर्वरित सदस्यांसह इंग्लंडला गेला नाही. अश्विन नंतर संघात सामील झाला. यानंतर विराट कोहलीलाही संसर्ग झाला, मात्र तोही वेळेत बरा झाला. आता रोहित शर्मालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याच वेळी, इंग्लंडचा यष्टिरक्षक बेन फोकसला मधल्या सामन्यादरम्यान संसर्ग झाल्याचे आढळून आले आणि त्याच्या जागी जॉनी बेअरस्टोला संघात घेण्यात आले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही कसोटी मालिका गेल्या वर्षी सुरू झाली होती, परंतु टीम इंडियामधील कोरोनाची प्रकरणे वाढल्याने शेवटची कसोटी पुढे ढकलण्यात आली होती, जी आता 1 जुलैपासून खेळवली जाणार आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे हा सामनाही पुढे ढकलण्याचा धोका आहे.