२६ वर्षे न्यायालयात सडत आहे जयललिता यांचे मौल्यवान सामान

तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे आयकर विभागाने जप्त केलेले मौल्यवान सामान २६ वर्षे उलटून गेली तरी अद्यापि बंगलोरच्या न्यायालयात पडून राहिल्याने त्यातील बरेच सामान सडू लागल्याचे उघड झाले आहे. ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याच्या, भाजपचे नेते सुब्रह्मण्यमस्वामी यांनी जयललिता यांच्या विरोधात १९९६ मध्ये दाखल केलेल्या केस मध्ये आयकर विभागाने जयललिता यांच्या घरावर धाडी टाकून हे सामान जप्त केले होते मात्र जयललिता यांचे निधन झाल्यावर त्यांच्यावरची केस बंद केली गेली. तरीही जप्त केलेले सामान बंगलोर सिविल न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावर पडून आहे. त्यांच्या रक्षणासाठी २४ तास चार पोलीस तैनात आहेत.

या सामानात ८०० किलो चांदी, २८ किलो सोने, ११३४४ साड्या, २५० शाली आणि ७५० पेक्षा अधिक चप्पल जोड, ९१ घड्याळे आणि ४१ एसी आहेत. जयललिता यांच्याकडे त्यावेळी ६६ कोटींची अवैध संपत्ती मिळाली होती. स्वामी यांच्या तक्रारीनंतर तत्कालीन डीएमके सरकारने जयललिता यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता आणि त्यानुसार या धाडी घातल्या गेल्या होत्या. सुरवातीला हा खटला तमिळनाडू मध्ये सुरु होता तो नंतर कर्नाटक मध्ये शिफ्ट केला गेला होता. जयललिता यांच्या निधनानंतर आयकर विभागाने हे सर्व सामान २००२ मध्ये सरकारकडे जमा केले होते असे समजते.

विशेष कोर्टाने जयललिता यांना सप्टेंबर २०१४ मध्ये तुरुंगवास सुनावला होता पण २०१५ मध्ये त्या तुरुंगाबाहेर आल्या. त्यानंतर सुप्रीम न्यायालयात या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. जयललिता यांच्या पक्षाने या सामानातील साड्या, शाली, चप्पल खराब होऊ लागल्या असून त्यांचा लिलाव केला जावा आणि अन्य सामान पक्षाला द्यावे अशी विनंती केली आहे. हे सामान जयललिता यांच्या नावे असलेल्या संग्रहालयात ठेवले जाईल असे पक्षाचे म्हणणे आहे.