भिंतीवर लघुशंका करताय? सावधान!
भारतात गेली अनेक वर्षे स्वच्छ भारत मोहीम राबविली जात आहे मात्र अजूनही नागरिकांच्या अंगवळणी ती पडलेली नाही. रस्त्याने जाताना रस्त्यांवर किंवा इमारतीच्या भिंतीवर लघुशंका म्हणजे लघवी करणे हा आजही सर्रास आढळणारा प्रकार. कितीही जागृती करा, पाट्या लावा, विविध मोहिमा राबवा, दंड करण्याची भीती दाखवा कशाचाच काही उपयोग होत नाही. पण जगाच्या पाठीवर असा उपद्रव फक्त भारतात आहे असे मात्र नाही. अगदी विकसित देशात सुद्धा ही समस्या तेथील सरकारांना भेडसावते आहे.
परदेशात कायदे अधिक कडक आहेत त्यामुळे भिंतींवर किंवा सार्वजनिक रस्त्यांवर लघवी करण्याचे प्रमाण भले कमी असेल तर पण ते आहे. अश्या उपद्रवी नागरिकांना धडा शिकविण्यासाठी जर्मनीने खास तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यातही देशातील महत्वाच्या इमारतींच्या भिंती या प्रकारे खराब होऊ नयेत यासाठी विशेष काळजी घेतली गेली आहे. या खास तंत्रज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीने समजा भिंतीवर लघवी केलीच तर ती भिंत हे मुत्र त्याच माणसाच्या अंगावर परत फेकून देते.
हा एक खास प्रकारचा रंग आहे. अत्यंत अत्याधुनिक असा हा रंग कुठलाही द्रव त्याच्यावर पडला तर त्वरित तो द्रव उलट फेकतो. जर्मनीत अनेक प्रसिद्ध इमारतींच्या भिंतीवर हा रंग दिला गेला आहे. हा रंग महाग आहे त्यामुळे निवडक ठिकाणीच सध्या तो वापरला गेला असल्याचे सांगितले जात आहे.