द्रौपदी मुर्मू यांच्या गावात प्रथमच उजळले विजेचे दिवे

भाजपप्रणीत आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी म्हणजे उबरपेडा गावात प्रथमच विजेचे दिवे उजळणार आहेत. मयूरभंज जिल्यातील उबरपेडा प्रभागात डूंगुरशाही आणि बदाशाही अशी दोन गावे येतात. या दोन गावांची लोकसंख्या ३५०० आहे. या गावातील लोक आजही रॉकेलच्या दिव्यांनी रात्री उजेड आणतात. घराबाहेर पडायची वेळ आली तर मोबाईल टॉर्च वापरतात पण मोबाईल चार्ज करण्यासाठी मात्र त्यांना दुसऱ्या गावात जावे लागते.

द्रौपदी मुर्मू ओडीसाच्या असून त्यांचा जन्म डूंगुरशाही या छोट्याश्या गावात झाला आहे. त्यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाल्यावर मिडिया मध्ये त्यांच्या गावात अजून वीज नाही ही बाब ठळकपणे समोर आली. द्रौपदी मुर्मू या गावात सध्या राहत नाहीत तर येथून २० किमीवरील रायरंगपूर येथे राहतात. पण प्रसारमाध्यमांची दखल घेऊन ओडीसा सरकारने या गावात तातडीने वीज पुरविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार  टाटा पॉवर नॉर्थ ओरिसा वितरण विभागने तातडीने ३८ खांब, ९०० मीटर केबल, ट्रान्सफॉर्मर,, ट्रक, बुलडोझरच्या सहाय्याने काम सुरु केले असून चोवीस तासात येथे वीज पुरवठा सुरु होत आहे असे समजते.