देशातील पहिली मॅक्लरेन जीटी ‘रूह बाबा’ कार्तिकला मिळाली गिफ्ट
देशातील पहिली मॅक्लरेन जीटी सुपरकार बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन याला भूलभुलैया टू या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल टी सिरीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांनी गिफ्ट म्हणून दिली आहे. या चित्रपटाचे ते निर्माते आहेत आणि कार्तिकची या चित्रपटातील ‘रूह बाबा’ ही भूमिका रसिकांच्या खूपच पसंतीस उतरली आहे.
कार्तिकने मॅक्लरेन जीटीचे फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. देशातील ही पहिलीच मॅक्लरेन जीटी सुपरकार ४.७ कोटी किमतीची असून तिला ३९४४ सीसीचे व्हीसी ट्वीन टर्बो पेट्रोल इंजिन, सात स्पीड ड्युअल क्लच ऑटोट्रान्समीशन सह दिले गेले आहे. ही कार ० ते १०० किमीचा वेग अवघ्या ३.२ सेकंदात घेते आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३२६ किमी. कार्तिकला लग्झरी कार्स आणि बाइक्सचा शौक आहे. त्याच्या संग्रही लोम्बार्गिनी उरस, मिनी कुपर, बीएमडब्ल्यू ५ सिरीज कार्स आहेत. त्याची नवी गिफ्ट मॅक्लरेन जीटी ऑरेंज रंगाची आहे.
या कारचे फोटो शेअर करून कार्तिक लिहितो,’ चायनीज खाण्यासाठी नवी टेबलगिफ्ट. कष्टाचे फळ गोड असते हे माहिती होते पण ते इतके मोठे असते हे माहिती नव्हते. भारतातली पहिली मॅक्लरेन जीटी, पुढचे गिफ्ट प्रायव्हेट जेट, सर!’ कार्तिकने नुकतीच रॉयल एन्फिल्ड क्लासिक ३५० बाईक खरेदी केली असून तो मुंबईत या बाईकवरून फिरताना दिसतो आहे.