आता रस्तेच वाजविणार हॉर्न
जगात सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात. जसजशी प्रगती होते तसतशी नवीनवी वाहने रस्त्यांवर येऊ लागतात. वाहनांची संख्या वाढली कि अपघात वाढतात. त्यातही डबल लेन रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण अधिक असते आणि पहाडी भागात, घाट रस्त्यात अपघातांची शक्यता अधिक वाढते. वळणदार रस्त्यांवर वाहन चालकांना फार सावध राहून वाहन चालवावे लागते कारण वळणांमुळे विरुध्द बाजूने येणारी वाहने समजत नाहीत. अश्या वेळी हॉर्न वाजवून विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनांना सूचना दिली जाते. तरीही अनेकदा हॉर्न वाजविले जात नाहीत आणि मग अपघात होतात. हिमालय पर्वत रांगा आणि पहाडी भागात असे अपघात जास्त प्रमाणात होतात.
यावर एक स्मार्ट उपाय हिंदुस्तान पेट्रोलियम आणि लिओ बर्नेट यांनी संयुक्त प्रयत्नातून काढला आहे. त्यांनी आता वाहन चालकांचे दुर्लक्ष झाले तरी रस्तेच हॉर्न वाजवतील असे तंत्र विकसित केले आहे. २०१७ मध्येच जम्मू श्रीनगर हायवे १ वर या साठी खास तयार केलेले खांब बसविले गेले असून त्याच्या चाचण्या कमालीच्या यशस्वी झाल्या असल्याचे समजते. जेथे घाट रस्ते आणि खूपच वळणे आहेत तेथे वळणावरच कोपऱ्यात हे स्मार्ट लाईट पोल बसविले गेले आहेत. या पोल्सच्या जवळ वाहन आले कि आवाज येऊ लागतो आणि त्यामुळे विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना समोरून वाहन येत आहे याची सूचना मिळते. परिणामी वाहनांची टक्कर होऊन अपघात होण्याची शक्यता कमी होते.
या रस्त्यावर स्मार्ट लाईट पोलचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आत्ता देशाच्या अन्य भागात, जेथे रस्ते अपघाताचे प्रमाण अधिक आहे अश्या ठिकाणी असे पोल उभारले जाणार आहेत. जम्मू श्रीनगर हायवे भागात या पोल्स मुळे अपघाताचे प्रमाण खूपच कमी झाले असल्याचे आकडेवारी सांगते. आता रोहतांग पास, मनाली लेह हायवे वर सुद्धा असे स्मार्ट लाईट पोल बसविले जाणार आहेत.