Presidential elections : यशवंत सिन्हा यांनी मागितला मोदी आणि राजनाथ यांच्याकडे पाठींबा, अडवाणींचा आशीर्वाद, सोमवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज


नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजपचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडेही पाठिंबा मागितला आहे. 84 वर्षीय सिन्हा हे अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अर्थ आणि परराष्ट्र मंत्री राहिले आहेत.

केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मू यांनी काल पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुर्मू यांना अनेक बिगर एनडीए पक्षांचाही पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात असला, तरी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार सिन्हा हेही रिंगणात उभे आहेत. ते सतत मोहीम राबवत आहेत.

यशवंत सिन्हा यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संपर्क साधला. पीटीआयच्या म्हणण्यानुसार त्यांनी दोन्ही नेत्यांना त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे आशीर्वादही मागितले. अडवाणी अटल सरकारमध्ये उपपंतप्रधान होते आणि त्याच सरकारमध्ये सिन्हा केंद्रीय मंत्री होते. प्रदीर्घ काळ भाजपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. मोदी सरकार-1 मध्ये त्यांचे पुत्र जयंत सिन्हा अर्थमंत्री होते. जयंत सिन्हा अजूनही भाजपचे खासदार आहेत, पण मोदी सरकार-2 मध्ये त्यांना मंत्री करण्यात आले नाही.

सीएम सोरेन यांना करून दिली आश्वासनाची आठवण
सिन्हा यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही फोन केला. सिन्हा यांनी त्यांना आठवण करून दिली की त्यांचा पक्ष जेएमएमने सामान्य विरोधी उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता. सिन्हा शुक्रवारी झारखंडमधून प्रचाराला सुरुवात करणार होते, पण आता जेएमएमने संथाल आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे त्यांनी तो पुढे ढकलला.

सोमवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज
सिन्हा सोमवार, 27 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी विरोधी पक्षातील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मुर्मू यांनी मागितला सोनिया, पवार, ममता यांचा पाठिंबा
दरम्यान सिन्हा यांच्या आधी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याकडे पाठिंबा मागितला. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहेत. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे.