गौतम अदानी- ६० वा वाढदिवस, ६० हजार कोटींची देणगी, अशी आहे जीवन कथा

देशातील बडे उद्योजक आणि जगातील धनकुबेरांच्या यादीत समावेश असलेले अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी वयाची साठी गाठली आहे. वडिलांचा १०० वा वाढदिवस आणि स्वतःचा ६० वा वाढदिवस असे निमित्त साधून ६० हजार कोटींची देणगी दिली जात असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. कार्पोरेट इतिहासात एका फौंडेशनला दिले गेलेले हे सर्वात मोठे दान आहे असे समजते. याचा वापर आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास क्षेत्रासाठी केला जाणार असल्याचे गौतम यांच्या पत्नी आणि अदानी फौंडेशनच्या प्रमुख प्रीती अडाणी यांनी सांगितले आहे.

या निमित्ताने प्रीती अदानी यांनी गौतम यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. त्या खाली त्या लिहितात, ३६ वर्षांपूर्वी माझे करियर बाजूला सारून गौतम यांच्या बरोबर नव्या प्रवासाची सुरवात केली. आज मागे वळून पाहते तेव्हा मला खूप अभिमान वाटतो.’ प्रीती या डेंटीस्ट आहेत.

गौतम यांनी शिक्षण कॉलेजच्या दुसर्या वर्षात असतानाच सोडले होते आणि मुंबईत हिरे व्यापारात नशीब आजमावण्यासाठी पाउल टाकले होते. १९८० चे हे दशक. पण अडाणी यांना मुंबई मध्ये यश मिळाले नाही. त्यावेळी त्यांच्या भावाने त्यांना प्लास्टिक व्यवसायात मदत करण्यासाठी गुजराथला बोलावून घेतले. तेथे त्यांनी प्रथम प्लास्टिक ग्रॅन्यूल आयात करण्याचा व्यवसाय सुरु केला. मग कृषी व्यापारी फर्म सुरु केली आणि आज अदानी ग्रुप खाणी, लॉजीस्टिक, पॉवर जनरेशन, वीज वितरण, एअरपोर्ट संचालन, सिमेंट, डेटा सेंटर अश्या अनेक उद्योगात पसरला आहे. पत्नी प्रीती त्यांच्या नेतृत्वाखाली अडाणी फौंडेशनची १९९६ मध्ये स्थापना केले गेली असून आज देशातील १८ राज्यात,२४०९ गावात समाज आणि विकास कार्य केले जात असून ३४ लाख लोकांच्या उत्थानासाठी हे फौंडेशन कार्यरत आहे.

वयाच्या २० व्या वर्षी कोटयाधीशांच्या यादीत आलेले गौतम अदानी यांचे १९९७ मध्ये अंडरवर्ल्ड डॉन फजूल रेहमान याने अपहरण केले होते. तसेच मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यावेळी जेव्हा ताज हॉटेलवर हल्ला झाला तेव्हा गौतम अदानी तेथे दुबई पोर्टच्या सीईओ बरोबर रात्रीचे जेवण घेत होते. त्या दोघांनी सारी रात्र त्यावेळी बाथरूम मध्ये लपून काढली आणि सकाळी साडेआठ वाजता त्यांची सुखरूप सुटका झाली असेही सांगतात.

अदानी यांच्या मालकीचे दिल्ली येथे अलिशान अदानी हाउस असून त्याची किंमत ४०० कोटी आहे. २०२१-२२ मध्ये त्यांची संपत्ती ७२.५ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. गौतम आणि प्रीती या जोडप्याला करण आणि जीत अशी दोन मुले आहेत.