गुगलवर ट्रेंड होताहेत एकनाथ शिंदे- ३३ देशात होताहेत सर्च
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उलथापालथ सुरु असतानाच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गेले तीन दिवस गुगल सर्च मध्ये टॉपवर आहेत. त्यांनी सर्च मध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यानाही मागे टाकल्याचे दिसत आहे. भारतात एकनाथ शिंदे यांच्यावरील सर्च ६४ टक्क्यांवर गेला असून सुमारे १० लाख लोक शिंदे यांना सर्च करत आहेत. इतकेच नव्हे तर जगभरात एकनाथ शिंदे यांच्या विषयी कुतूहल निर्माण झाले असल्याचे दिसून आले आहे कारण सुमारे ३३ देशातील नागरिक एकनाथ शिंदे सर्च करत असून त्यात पाकिस्तान आघाडीवर आहे. नेपाळ, सौदी, थायलंड, कॅनडा, मलेशिया, बांग्लादेश, जपान मध्येही शिंदे ट्रेंड होत आहेत. पाकिस्तान आणि सौदी मध्ये हा सर्च ५० टक्क्यांवर गेला आहे.
महाराष्ट्राचे राजकारण या निमित्ताने जगाच्या नकाशावर आल्याचे बोलले जाऊ लागले आहे. महाविकास आघाडीचे उद्धव सरकार जाणार की तगणार याविषयी अजून निश्चित सांगणे शक्य झालेले नाही. मात्र गेल्या चार दिवसात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील मंत्र्यांनी हजारो कोटींचे सरकारी आदेश जारी केले असून त्याची माहिती वेबसाईटवर उपलब्ध झाली आहे. २० ते २३ जून या काळात असे १८२ सरकारी आदेश जारी झाले असून त्यात प्रामुख्याने राजकोशातून विकास आणि अन्य कामासाठी पैसे देण्याबाबतचे आदेश आहेत.
बंडखोरी करून शिंदे गोहाटी मध्ये पोहोचले तेव्हापासूनच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने जीआर काढण्याची जणू स्पर्धा लावल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे तर १७ जून या एकाच दिवशी ८४ पेक्षा जास्त जीआर काढले गेले आणि त्यात शिवसेनेचे गुलाबराव पाटील याच्या जलपुरवठा खात्याचा समावेश आहे. आता गुलाबराव पाटील शिंदे यांच्या गोटात दाखल झाले आहेत. दरम्यान भाजपचे प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याकडे या जीआर स्पर्धेला लगाम लावला यासाठी पत्र लिहिले असून ४८ तासात १६० जीआर निघणे ही संशायास्पद बाब असल्याचे म्हटले आहे.