IND vs SL : भारतीय महिला संघाने पहिल्या T-20 सामन्यात केला श्रीलंकेचा 34 धावांनी पराभव, जेमिमा ठरली सामनावीर


दांबुला : भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी येथे पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा 34 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना भारताने सलामीवीर शेफाली वर्मा (31) आणि सामनावीर जेमिमाह रॉड्रिग्ज (36*) यांच्या उपयुक्त खेळीमुळे 20 षटकांत 6 बाद 138 धावा केल्या.

श्रीलंकेविरुद्ध फिरकीपटू राधा यादवने (2/22) शानदार गोलंदाजी करत फलंदाजांना धावा करण्याची संधी दिली नाही आणि 5 विकेट्सवर 104 धावाच करता आल्या. भारताकडून दीप्ती, पूजा आणि शेफाली यांनी 1-1 बळी घेतला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि भारताच्या दोन विकेट 17 धावांवर पडल्या. स्मृती मानधना (1) आणि मेघना (0) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतल्या. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने (22) शेफालीला चांगली साथ दिली आणि संघाला 50 चा टप्पा पार करून दिला. दोघीही बाद झाल्यानंतर जेमिमाने रिचा (11) आणि पूजा (14) यांच्यासोबत छोट्या महत्त्वाच्या भागीदारी करत संघाची धावसंख्या 138 धावांपर्यंत पोहोचवली.

जेमिमाने 27 चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. 139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला सुरुवातीपासूनच दडपण ठेवले आणि ठराविक अंतराने विकेट्स घेत राहिले. 54 धावा झाल्या, तोपर्यंत श्रीलंकेच्या संघाने 4 विकेट गमावल्या होत्या. कविशा दिलहरीच्या नाबाद 47 धावांच्या खेळीमुळे संघाला 100 धावांचा टप्पा पार करता आला. आता दुसरा टी-20 सामना 25 जून रोजी दांबुलामध्येच होणार आहे.