२०२४ च्या निवडणुकीनंतर देशात ५० राज्ये होणार- मंत्र्याचा दावा

आगामी लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये होणार आहेत. त्या पार पडल्या कि अमेरिकेप्रमाणे भारतात सुद्धा राज्याचे विघटन करून ५० राज्ये निर्माण केली जाणार आहेत. या योजनेवर पंतप्रधान मोदी गंभीरपणे विचार करत आहेत असा दावा कर्नाटकचे खाद्य आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कट्टी यांनी केला आहे. या प्रक्रियेत उत्तर कर्नाटक नवे राज्य बनेल असाही त्यांचा दावा आहे. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी  असा कोणताही प्रस्ताव आपल्याला माहिती नाही असा खुलासा केला आहे.

कट्टी म्हणतात,’ राज्ये छोटी असतील तर त्यांचा विकास वेगाने होतो तसेच नवीन रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. गेल्या काही वर्षात राज्यांची लोकसंख्या वाढली आहे परिणामी राज्य सरकारच्या विकास कामांवर बोजा होतो आहे. यामुळे अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांचे विभाजन करून छोटी राज्ये बनविण्याची योजना विचाराधीन आहे आणि २०२४ च्या निवडणुका झाल्यावर या प्रक्रियेला गती येऊ शकते. सध्याची परिस्थिती पाहता कर्नाटकात २, उत्तर प्रदेशात ४, महाराष्ट्रात तीन नवी राज्ये होऊ शकतात.

अमेरिकेत अशी ५० छोटी राज्ये आहेत तर अधिक लोकसंख्या असूनही भारतात फक्त २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतात नवीन राज्ये बनविताना भाषेचा आधार घेतला गेला असून जेवढ्या भाषा  तेवढी राज्ये असे प्रमाण स्वीकारले गेले आहे. मात्र अटलबिहारी सरकारच्या काळापासूनच छोटी राज्ये करण्यास भाजपने प्राधान्य दिले आहे असेही दिसून आले आहे.