रामनाथ कोविंद यांच्यासाठी तयार होतोय, १२ जनपथ बंगला

सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती पदाची मुदत २४ जुलै रोजी संपत असून त्या नंतर त्यांच्यासाठी माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान ज्या १२ जनपथ या बंगल्यात ३० वर्षे राहिले तोच बंगला तयार केला जात आहे. कोविंद यांच्या कन्येने नुकतीच या बंगल्याला भेट देऊन पाहणी केल्याचे समजते. लुटीयंस दिल्ली मधील सर्वात मोठ्या बंगल्यांपैकी हा एक आहे.

रामविलास पासवान यांनी या बंगल्यात ३० वर्षे वास्तव्य केले होते आणि त्यांच्या निधनानंतर हा बंगला खाली करण्यासाठी त्यांचा मुलगा चिराग याला नोटिस बजावली गेली होती. त्यानुसार चिराग यांनी एप्रिल मध्ये हा बंगला खाली केला होता. या बंगल्याचा वापर पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या बैठका आणि अन्य कार्यक्रमांसाठी केला जात होता. मात्र रामविलास यांच्या निधनानंतर लोकजनशक्ती पक्षात फुट पडली असून चिराग आणि त्यांचे काका पशुपती असे दोन गट पडले आहेत.

अगोदर हा बंगला रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना दिला गेला होता मात्र वैष्णव पृथ्वीराज रोड वरील निवासात राहायला गेले आहेत. त्यामुळे आता हा बंगला निवृत्तीनंतर रामनाथ कोविंद याचे निवासस्थान असेल असे समजते.