प्रियांका चोप्राचे अमेरिकेत दुसरे स्टोर- सोना होम
बॉलीवूड प्रमाणेच हॉलीवूड गाजवत असलेली प्रियांका चोप्रा आता अमेरिकेत स्थायिक झाली असून तिने आता न्यूयॉर्क मध्ये नवे स्टोर खोलले आहे. सोना होम या नावाने हे व्हेन्चर सुरु केले गेले असून त्याची माहिती प्रियांकाने इन्स्टाग्राम वर व्हिडीओ शेअर करून दिली आहे. या होमवेअर मध्ये होम डेकोर, क्रोकरी सह विविध वस्तू आणि सेवा मिळणार आहेत. इन्स्टाग्राम व्हिडीओ मध्ये प्रियांका कोफौंडर मनीष गोयल यांच्या सह दिसते आहे.
या पूर्वी प्रियांकाने अमेरिकेत सोना नावाचे भारतीय रेस्टॉरंट सुरु केले असून येथे पाणी पुरी, सामोसा, वडापाव, कुलचा सह विविध खास भारतीय पदार्थ मिळतात. अर्थात मुंबईचा वडापाव मुंबईमध्ये १५ -२० रुपयात मिळतो तो प्रियांकाच्या सोना रेस्टॉरंट मध्ये एक हजार रुपयांना मिळतो. तीच कथा अन्य पदार्थाची आहे.
सोना होम विषयी बोलताना प्रियांका म्हणते, ‘भारतीय परंपरा आणि संस्कृती अमेरिकन घराचा हिस्सा बनावा असा प्रयत्न आहे. सर्वाना या स्टोर ची ओळख करून देताना अभिमान वाटतो आहे. भारतातून येथे येऊन दुसरे घर करणे हे माझ्यासाठी आव्हान होते पण येथेही मला दुसरा परिवार आणि मित्र मिळाले आहेत. मी जे करते त्यात भारताचा काही हिस्सा असतोच. सोना होम अमेरिकन लोकांना भारतीय संस्कृतीशी जोडण्यास मदतगार होईल. लोकांना एकत्र जोडणारी अशी भारतीय संकृतीची ओळख आहे. अमेरिकेत सुद्धा या माध्यमातून हे कल्चर रुजेल आशा आहे.’