गुवाहाटी रॅडीसन हॉटेल ७ दिवस बुक- केला जात आहे एवढा खर्च
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाप्रमुख पदालाच आव्हान देऊन महाविकास आघाडीतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांचा पाठींबा वाढत चालला असून आता त्यांच्या गटात काही अपक्षांसह ४२ आमदार जमा झाल्याचा दावा केला जाऊ लागला आहे. इतकेच नव्हे तर आणखी सहा आमदार गोहाटीकडे रवाना झाल्याचेही सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट गोहाटीच्या ज्या रॅडीसन ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेल मध्ये मुक्कामास आहेत ते हॉटेल सुद्धा आता चर्चेत आले असून या हॉटेलसाठी किती खर्च केला जातोय याची माहिती मिळू लागली आहे.
सर्वप्रथम हे स्पष्ट झाले आहे कि एकनाथ शिंदे यांचे आमदार बुधवारी सकाळी या हॉटेलमध्ये आले असून या हॉटेल मधील ७० खोल्या सात दिवसांसाठी बुक केल्या गेल्या आहेत. एकूण १९६ खोल्या असलेल्या या हॉटेलमध्ये नवीन बुकिंग घेतले जात नसल्याचे आणि त्यामुळे हे हॉटेल महाराष्ट्राचे पॉवर सेंटर बनल्याचे दिसून येत आहे. गोहाटी मधल्या काही अलिशान हॉटेल मध्ये या हॉटेलचा समावेश होतो. हॉटेलच्या रूम्स साठी ५६ लाख रुपये भाडे भरले गेले आहे. शिवाय खाणे पिणे, रोजचे अन्य खर्च आणि सेवा यासाठी रोज ८ लाख रुपये खर्च केला जात आहे.
हॉटेलचे बँकेट आणि रेस्टॉरंट सुद्धा बाहेरच्या लोकांना बंद केले गेले आहे. ज्या चार्टर विमानातून हे आमदार गोहाटीला आले त्याचा खर्च सुद्धा कमी नाही. साधारण ३० जणांच्या प्रवासासाठी ५० लाख असा हा खर्च आहे. एकंदरीत पाहता एकनाथ शिंदे माघार घेण्याच्या मूड मध्ये नाहीतच पण गोहाटी मध्ये अधिक काळ राहण्याच्या तयारीनेच आले आहेत असे समजते.