अमेरिकेत सुद्धा बुलडोझरचा जलवा
उत्तरप्रदेशात प्रचंड चर्चेत असलेला बुलडोझर आता अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात सुद्धा त्याचा जलवा दाखवत आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी शेकडो अवैध व धोकादायक दुचाकी वाहने बुलडोझरच्या मदतीने नष्ट केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या कारवाईला महापौर स्वतः हिरवा कंदील दाखवत असल्याचे या व्हिडीओ मध्ये दिसते आहे.
न्यूयॉर्क मधील रस्ते सुरक्षित करण्यासाठी डर्ट बाइक्स व एटीव्ही जप्त केल्या जात असून अशी वाहने नष्ट करण्यास प्राधान्य दिले जात आहे. बुलडोझरने ही कारवाई करण्यामागे ज्या नागरिकांकडे अशी वाहने आहेत आणि ती बेकायदा वापरली जात आहेत त्यांना स्पष्ट संदेश देणे हा उद्देश आहे. महापौराच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या या बुलडोझर कारवाईत १०० वाहने चुरडून टाकण्यात आली. हा व्हिडीओ ट्वीटर वर शेअर करण्यात आला असून त्याखाली ‘आम्हाला दहशत नको आहे, अन्यथा कुचलून टाकू’ असे म्हटले गेले असून हा व्हिडीओ १५ लाख वेळा पाहिला गेल्याचे दिसून येत आहे.
महापौर म्हणाले, शहरात अशी अनेक वाहने आहेत, ज्याचा मालक वेगळा आणि चालविणारा वेगळा आहे. खरेदीची कागदपत्रे नाहीत. या वाहनाच्या सहाय्याने उपनगरे आणि शहरात अनेकदा स्थानिक लोकांना दहशत दाखवून लुबाडले जात आहे. ही एक टोळीच आहे. चोऱ्या करून अशी वाहने पळविली जातात. २०२१ पासून डर्ट बाइक्स आणि एटीव्ही जप्त करण्याची सुरवात झाली असून आत्तापर्यंत ९०० वाहने जप्त केली गेली आहेत.