Maharashtra Political Crisis : 24 तासांत बंडखोर आमदार शिंदेंसोबत मुंबईत परतले तर आघाडी सोडण्यास तयार… राऊतांच्या वक्तव्याने राजकीय भूकंप


मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. 24 तासांत सर्व बंडखोर आमदार मुंबईत परतले, तर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करू शकते, असे राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. आतापर्यंत केवळ उद्धव ठाकरेच नाही, तर शरद पवार आणि काँग्रेस पक्षही महाविकास आघाडी सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अशा स्थितीत आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचे म्हणत राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे. हिंमत असेल तर मुंबईत या, आघाडीमधून बाहेर पडण्याचा विचार करू, असे राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांची मीडियासमोर ओळख करून दिली. यावेळी एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल करत राऊत म्हणाले, या लोकांमध्ये मुंबईत येण्याची हिंमत नाही. येथे आल्यावर त्यांना जे काही म्हणायचे आहे ते सांगावे. येथे येऊन पत्रव्यवहार करा. पण हे सर्व लोक गुवाहाटीमध्ये बसून मोठ्या बाता मारत आहेत. हिंमत असेल तर मुंबईला या. तुमचा मुद्दा उद्धवजींसमोर ठेवा. मला खात्री आहे की तुमचे नक्की ऐकले जाईल. 24 तासांत परत या. आम्ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा विचार करू.

एक किलोमीटर पळून तावडीतून सुटलो – नितीन देशमुख
सुरतहून परतलेले आमदार नितीन देशमुख म्हणाले की, तेथे जबरदस्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मला जबरदस्तीने सुरतला नेण्यात आले. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपकडून अनेकदा प्रयत्न झाले. दुसरीकडे कैलास पाटील म्हणाले की, मी 1 किलोमीटर धावून त्यांच्या तावडीतून बाहेर पडलो. मजबुरीमुळे अनेक आमदार परत येत नसल्याचेही या दोन्ही आमदारांनी सांगितले. उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी परतणार आहेत.

तेव्हा शिंदे यांनी मला घरी बोलावले…
गुवाहाटीहून परतलेले आमदार कैलास पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी आम्हाला घरी बोलावले होते. तिथे एका ठिकाणी चालत जाण्यास सांगितले. त्यानंतर महापौर बंगल्यावर नेण्यात आले. पुढे जायचे आहे म्हणत गाडी बदलली. त्यानंतर ठाण्याहून वसईला नेण्यात आले. पुढे गेल्यावर लक्षात आले की काहीतरी गडबड आहे. आपल्याला चुकीच्या दिशेने नेले जात आहे.

मग आम्ही पुन्हा पायी बाहेर आलो आणि मोटारसायकलच्या सहाय्याने वाटेत मधूनच हॉटेलवर थांबलो. यानंतर एका ट्रकच्या मदतीने मी मुंबईतील दहिसर टोल नाक्यावर पोहोचलो. उत्तर प्रदेशातील लोकांनी मला मदत केली आणि कशीतरी मी मुंबई गाठली. मात्र, शिंदे गटाने एक व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये पाटील हे शिंदे यांच्या टीमसोबत कोणतीही अडचण न करता प्रवास करत असल्याची माहिती आहे.