High Profile Divorce : 91 वर्षीय मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक चौथ्या घटस्फोटाच्या तयारीत, अभिनेत्री जेरी हॉलपासून होणार वेगळे


वॉशिंग्टन – अब्जाधीश मीडिया बिझनेसमन रुपर्ट मर्डोक वयाच्या 91 व्या वर्षी अभिनेत्री जेरी हॉलला घटस्फोट देणार आहेत. त्यांचा हा चौथा घटस्फोट असेल. 2016 मध्ये त्यांनी 65 वर्षीय जेरीसोबत लग्न केले होते.

मर्डॉक यांच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा वर्षांनी दोघेही आपले लग्न मोडणार आहेत. अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी मर्डोक यांच्या जगभरातील मीडिया नेटवर्कमध्येही त्यांच्या घटस्फोटाची चर्चा असल्याचे वृत्त आहे.

मर्डोक यांनी मार्च 2016 मध्ये लंडनमध्ये जेरीशी लग्न केले. फॉक्स कॉर्प (FOXA.O) चे अध्यक्ष आणि त्यांची माजी सुपरमॉडेल पत्नी जेरी यांचे लग्न तेव्हा वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते. गेल्या वर्षी मर्डोक यांनी न्यूयॉर्कच्या टॅव्हर्न ऑन द ग्रीनमध्ये त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा केला. मर्डोक यांच्या मीडिया व्यवसायांमध्ये फॉक्स कॉर्प, फॉक्स न्यूज चॅनेलची मूळ कंपनी आणि वॉल स्ट्रीट जर्नल्स न्यूज कॉर्प (NWSA.O) यांचा समावेश आहे.

पॅट्रिशिया बुकरशी झाले होते पहिले लग्न
रुपर्ट मर्डोक यांचे पहिले लग्न पॅट्रिशिया बुकरशी झाले होते. ते 1956 ते 1967 पर्यंत चालले. यानंतर दुसरे लग्न एन्ना मारिया टोर्वशी झाले. ते 1967 ते 1999 पर्यंत चालले. त्यानंतर मर्डोक यांनी 1999 मध्ये वेंडी डेंगशी तिसरे लग्न केले. ते 2013 पर्यंत चालले. मर्डोक यांनी 2016 मध्ये जेरी हॉलशी लग्न केले. जेरीने ‘बॅटमॅन’ आणि ‘द ग्रॅज्युएट’ सारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मर्डोक यांच्या आधी, जेरी हॉलने रॉक स्टार आणि गायक मिक जॅगरशी लग्न केले होते.