पहिल्या सराव सामन्यात लिसेस्टरशायरकडून खेळणार चार भारतीय खेळाडू, रोहित शर्मासमोर बुमराह


लीसेस्टर – इंग्लंडविरुद्ध 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी संपूर्ण टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. रविचंद्रन अश्विन वगळता संपूर्ण संघ इंग्लंडला पोहोचला असून गुरुवारपासून लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या सामन्यात भारताचे चार खेळाडू लीसेस्टरशायर संघाकडून खेळताना दिसणार आहेत. भारताचा चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि प्रसिद्ध कृष्णा हे पहिल्या सराव सामन्यात त्यांच्याच संघाविरुद्ध खेळतील. पुजारा काउंटी क्रिकेटचा एक भाग आहे आणि अलीकडे ससेक्ससाठी खेळला आहे.

काउंटीच्या चालू हंगामात पुजाराने शानदार फलंदाजी केली. यानंतर त्याचे भारतीय संघात पुनरागमन निश्चित झाले. संघ जाहीर झाला, तेव्हा पुजारा पुन्हा एकदा कसोटी संघात होता, तर श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याला संधी देण्यात आली नव्हती.

भारतीय खेळाडू लीसेस्टरशायरकडून का खेळतात?
सर्व भारतीय खेळाडूंना सरावाची पूर्ण संधी मिळावी यासाठी भारताच्या चार खेळाडूंचा लिसेस्टरशायरच्या संघात समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाचे सर्व खेळाडू एकाच संघातून खेळले असते तर काहींना कमी फलंदाजी किंवा गोलंदाजी मिळाली असती. ही परिस्थिती टाळण्यासाठी भारताच्या चार खेळाडूंना विरोधी संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंना सरावाची पुरेशी संधी मिळेल. लीसेस्टरशायरच्या संघात ज्या चार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, त्यात प्रसिद्ध कृष्णा मुख्य सामन्यात खेळण्यावर साशंकता आहे. त्याच्याशिवाय अन्य तीन खेळाडू 1 जुलैपासून पहिला कसोटी सामना खेळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

पहिल्या सराव सामन्यासाठी दोन्ही संघ
लीसेस्टरशायर संघ: सॅम्युअल इव्हान्स (कर्णधार), रेहान अहमद, सॅम्युअल बेट्स (विकेटकीपर), नॅथन बोले, विल डेव्हिस, जॉय इव्हिसन, लुईस किम्बर, अबिदिन सकंदे, रोमन वॉकर, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, प्रणंद कृष्णा.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.