नवनीत  राणा आणि कंगनाची बत्तीशी वठणार?

महाविकास आघाडी सरकार शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे चांगलेच अडचणीत आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला नसला तरी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ सोडून मातोश्रीवर तळ हलविला आहे याच्या बातम्या येत असतानाच बॉलीवूड अभिनेत्री कंगना आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेली वाणी खरी ठरणार का याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या दोघीचे तळतळाट उद्धव ठाकरे यांना भोवले का यावर सोशल मिडिया मध्ये जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

मुस्लिमाच्या अजान विरोधी प्रकरणात नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा वाचा असे आव्हान देऊन न वाचल्यास मातोश्री समोर हनुमान चालीसाचे पठण ते दोघे करतील असे आव्हान दिले होते. त्यावर या दोघांच्या विरोधात केस दाखल करून त्यांना १३ दिवस तुरुंगात डांबले गेले होते. तुरुंगातून बाहेर आल्यावरही नवनीत राणा यांची तेढ कायम होती आणि त्यांनी हनुमान चालीसाचा पाठ करतानाच उद्धव ठाकरे यांना,’ मी तुमच्या समोर उभी आहे, निवडणूक लढवून जिंकून दाखवा, महिलेची ताकद आणि इमानदारी यापुढे कुणी आव्हान देऊ शकत नाही’ असे म्हटले होते. शिवसेनेची हिंदुत्व प्रतिमा यामुळे मलीन झाली होती.

दुसरीकडे बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी ठाकरे यांच्यावर हल्ला चढविला होता तेव्हा बीएमसीने तिच्या मुंबईतील घरावर हातोडा चालविला होता. मात्र कंगनाने माघार न घेता,’ उद्धव ठाकरे यांना आज माझे घर तुटले आहे पण उद्या तुमची घमेंड तुटेल, ये वक्त का पहिया है, हमेशा एकजैसा नही रहता, जय हिंद, जय महाराष्ट्र’ असे ट्वीट केले होते. कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पुन्हा वेगाने व्हायरल झाला आहे.