इंडियन ऑइलने आणली, सूर्य नूतन चूल

देशातील अग्रणी इंडिअन ऑईल कार्पोरेशनने घरात वापरासाठी सौर चूल आणली असून ही चूल रिचार्ज करता येते. सूर्य नूतन चूल असे तिचे नामकरण केले गेले आहे. या चुलीमध्ये एकदा पैसे गुंतवले कि देखभाल खर्च येत नाही शिवाय लाकूड, इंधनाची गरज नाही आणि प्रदूषण नाही अशी तिची वैशिष्टे आहेत. पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमात या चुलीवर तयार केलेल्या स्वयंपाकाची मेजवानी दिली गेली.

आयओसीच्या एचआर विभागाचे प्रमुख एस व्ही रामकुमार म्हणाले ही सौर चूल, सौर कुकर पेक्षा वेगळी आहे. ही चूल उन्हात ठेवावी लागत नाही. एक केबल छतावरच्या सोलर प्लेटला जोडली जाते आणि त्यातून येणारी उर्जा केबलच्या माध्यमातून चुलीला मिळते. चुलीला सोलर प्लेट असून अगोदर उर्जा थर्मल बॅटरी मध्ये साठविली जाते. यामुळे रात्रीच्या वेळी सुद्धा पदार्थ शिजविण्यासाठी या चुलीचा वापर करता येतो. चार माणसांच्या कुटुंबाचे तीन वेळचे जेवण यावर शिजू शकते. या चुलीचा प्रोटोटाईप सध्या तयार केला गेला असून विविध ६० ठिकाणी तिच्या चाचण्या घेतल्या गेल्या आहेत.

या चुलीचे व्यावसायिक लाँचिंग लवकरच केले जाणार आहे. तिची किंमत १८ ते ३० हजार दरम्यान असेल पण सरकारी अनुदानामुळे ती १० ते १२ हजारात मिळू शकणार आहे. या चुलीचे लाईफ १० वर्षांचे असल्याचे सांगितले गेले आहे.