५०० रुपयाच्या नोटेपेक्षा २०० ची नोट अधिक महाग?

देशात वाढत्या महागाईने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. दररोज जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत आणि त्यामुळे मिळणारा पैसा कसा पुरवायचा यांची विवंचना सतावत आहे. ही महागाईची झळ देशाच्या चलनी नोटा छापणाऱ्या रिझर्व बँकेला सुद्धा बसली असल्याचे समोर आले आहे. रिझर्व्ह बँकेला नोटा छपाई करणे खर्चिक काम बनले असल्याचे माहिती अधिकार अंतर्गत केलेल्या एका खुलाशातून स्पष्ट झाले आहे.

या संदर्भात करण्यात आलेल्या एका अर्जाला उत्तर देताना रिझर्व बँकेने कोणत्या नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो याची तपशीलवार माहिती दिली आहे. त्यानुसार सध्या १० रुपयाच्या नोटेचा छपाई खर्च २०रुपयाच्या नोटेपेक्षा जास्त आहे तर २०० रुपयाच्या नोटेची छपाई ५०० रुपयापेक्षा अधिक खर्चिक आहे. नोटा छापण्यासाठी लागणाऱ्या कागदाच्या किमतीतील वाढ हे त्यामागचे कारण सांगितले जात आहे. २ हजार रुपये मूल्याच्या नोटेची छपाई जवळ जवळ बंदच केली गेल्याचेही सांगितले गेले आहे.

सध्याच्या खर्चानुसार १० रुपयांच्या १ हजार नोटा छापायला ९६० रुपये तर २० रु.च्या नोटेसाठी ९५० रुपये खर्च येतो आहे. ५० रुपयांच्या १ हजार नोटांसाठी ११३०, १०० रुपयाच्या नोटांसाठी १७७०, २०० रुपयांच्या नोटांसाठी २३७० तर ५०० रुपयांच्या नोटांसाठी हाच खर्च २२९० रुपये आहे. महागाईचा सर्वाधिक परिणाम ५० रुपये नोटेवर झाला असून २०२०-२१ मध्ये हा खर्च ९२० होता तो आता वाढून ११३० वर गेला आहे. सर्वाधिक कमी परिणाम २० रुपये नोटेवर झाला असून २०२०-२१ मध्ये यासाठी ९४० रुपये खर्च येत असे तो आता ९५० वर गेला आहे. ५०० रुपये नोटेवर मात्र काहीही परिणाम झालेला नाही असे सांगितले गेले आहे.