रोज चार किलो सोने अंगावर घालून फिरतो हा गुगल गोल्डन बाबा

बॉलीवूड मधील संगीतकार भप्पी लाहिरी नेहमीच ते अंगावर घालत असलेल्या सोन्याच्या दागिन्यांमुळे चर्चेत असत. एकूण भारतीयांना सोने वेड आहेच आणि त्यातील काही लोकांमध्ये सोन्याचे वेड जरा जास्त प्रमाणावर आहे. अश्या सोन्याने लगडलेल्या काही लोकांचे फोटो काही काळ सोशल मिडीयावर चर्चेत राहिले आहेत. कानपूर येथील सोन्याचे चालते फिरते दुकान असा ज्याचा उल्लेख होतो, ते गुगल गोल्डन बाबा यापैकीच एक आहेत.

मनोज सेंगर असे त्यांचे नाव असून ते मनोजानंद बाबा तसेच गुगल गोल्डन बाबा नावाने ओळखले जातात. अंगावरच्या सोन्याच्या दागिन्यांनी ते नेहमी चर्चेत असतात. ते रोज चार किलो सोन्याचे दागिने अंगावर मिरवतातच पण पायात साडेचार किलो चांदीची चप्पल घालतात. इतकी जड चप्पल घालून कुणी चालू शकणार नाही पण मी चालतो असा त्याचा दावा आहे. सोन्याचे दागिने घालण्याबाबत ते असे सांगतात, कि त्यांचे घराणे क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय प्राचीन काळापासून सोने घालत आले आहेत त्यामुळे ते पूर्वजांची प्रथा पाळत आहेत.

करोना आल्यापासून करोना बचावासाठी त्यांनी १०१ ग्राम सोन्याचा मास्क बनवून घेतला असून तोच मास्क ते वापरतात. त्यांच्या गळ्यात २६१ ग्राम वजनाचा सोन्याचा शंख, शिवकवच, दुर्गा प्रतिमा आणि सोन्याच्या अनेक माळा आहेत शिवाय ते लड्डू गोपालची सोन्याची मूर्ती बरोबर ठेवतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी रिव्होल्व्हर साठी सोन्याचे कव्हर बनविले आहे. गुगल गोल्डन बाबांवर अनेकदा हल्ले झाले आहेत आणि अनेकदा त्यांना धमक्या येतात. त्यामागे सोने लुट करणांऱ्याचा हात आहे असे सांगितले जाते. गुगल गोल्डन बाबा त्यांच्या साठी आता सोन्याचे कवच बनवत आहेत आणि पूजा पाठ करून हे कवच ते परिधान करणार आहेत असे समजते.