सायंकाळपर्यंत पडणार का महाविकास आघाडीचे सरकार ? पवारांची भेट घेऊन उद्धव ठाकरे देऊ शकतात राजीनामा


मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय संकट अधिकच गडद होत चालले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा बरखास्त होऊ शकते. दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून मंत्रीपद काढून टाकले आहे. दरम्यान, आज संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उर्वरित आमदार आणि खासदारांची बैठक घेणार असून, त्यानंतर ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी बातमी समोर येत आहे.

यानंतर उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, उद्धव ठाकरे प्रथम त्यांच्या उर्वरित आमदार आणि खासदारांची भेट घेतील आणि त्यांना त्यांची भूमिका सांगतील. उद्धव काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशीही चर्चा करून परिस्थिती स्पष्ट करणार आहेत. सरकार अल्पमतात आले असून काँग्रेसला याची जाणीव असल्याचे काँग्रेसचे सूत्र सांगत आहेत.

मला 46 हून अधिक आमदारांचा पाठिंबा : शिंदे
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की, त्यांना सध्या 46 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. हे सर्व आमदार शिवसेना आणि मित्रपक्षांचे आमदार असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे म्हणाले की, त्यांच्याकडे शिवसेनेचे 37 हून अधिक आमदार आहेत. आमदारांसोबतच्या बैठकीनंतर पुढील निर्णय होणार आहे.