‘सामना’त दावा, गुजरात पोलिसांकडून सुरतमध्ये शिवसेनेच्या आमदारांना मारहाण, नितीन देशमुख यांना दाखल करावे लागले रुग्णालयात


मुंबई – महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोठा दावा केला आहे. शिवसेनेने ‘सामना’ या मुखपत्रात लिहिले आहे की, सुरतमध्ये शिवसेनेच्या आमदारांना गुजरात पोलिसांनी मारहाण केली आहे. त्यांना मुंबईत यायचे होते, पण गुजरात पोलिसांनी त्यांना पकडले आणि सुरतला नेले, तिथे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांना एवढे मारले की त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पत्नी हरवल्याची तक्रार दाखल
याआधी मंगळवारी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजली यांनी अकोला पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्या म्हणाल्या, माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे. मंगळवारी ते घरी येणार होते, मात्र त्यांचा फोन लागत नव्हता. ते बेपत्ता झाले आहेत.

दहा आमदारांना गुजरातमध्ये जबरदस्तीने नेण्यात आले
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेच्या 10 आमदारांना उचलून गुजरातला नेण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने सामनामध्ये केला आहे. यातून चार ते पाच आमदारांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुजरात पोलिसांनी त्यांना पकडले आणि ऑपरेशन लोटसच्या लोकांच्या ताब्यात दिले. आमदार कैलास पाटील हे घेराव तोडून तेथून निसटून कसे तरी मुंबईत आले, असे शिवसेनेने म्हटले आहे.

आमदारांना केली एअरलिफ्ट
महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे 40 आमदार आसाममधील गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. वृत्तानुसार, त्यांना एका विशेष विमानाने गुवाहाटी येथे नेण्यात आले आहे. यानंतर त्यांना बसमधून हॉटेलमध्ये उतरवण्यात आले. हॉटेलभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.