४० आमदार सोबत, आणखी १० लवकरच येणार- एकनाथ शिंदे यांचा दावा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बाबतचा सस्पेन्स अधिक गहिरा झाला असून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोबत ४० आमदार असल्याचा आणि आणखी १० आमदार लवकरच त्यांना येऊन मिळणार असल्याचा दावा केला आहे. सोमवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या सह काही आमदार गुजराथ मधील सुरत शहरात एका हॉटेल मध्ये दाखल झाले होते आणि मंगळवारी रात्री हे सर्व आमदार आसाम मधील गोहाटी येथे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. गोहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका चार्टर्ड विमानातून हे सर्व आमदार सकाळी ६ वा. उतरल्याचे समजते. यात नक्की किती आमदार होते हे स्पष्ट झालेले नसले तरी विमानात क्रू सह ८९ प्रवासी होते अशी माहिती मिळाली आहे.

गोहाटीला रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी सुरत मधील हॉटेल मध्ये सर्व आमदारांसोबत काढलेला एका फोटो प्रसिद्ध केला आहे. गोहाटी मध्ये रवाना झालेले आमदार रॅडीसन ब्ल्यू हॉटेल मध्ये उतरले असून गोहाटी मध्ये भाजप सरकार आहे आणि भाजपचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी हे आमदार येण्यापूर्वी या हॉटेलला भेट दिली होती असे समजते.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला जिवंत ठेवायची आहे, आमचा कोणावरही आक्षेप नाही’ असे म्हटले आहे. सोमवारी त्यांनी उद्धव ठाकरे यांना भाजप सोबत पुन्हा जा अशी अट घातल्याची चर्चा होत होती. दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी १ वा. कॅबिनेट बैठक बोलावली आहे. राज्यपाल कोशारी यांची भेट घेण्यासाठी एकनाथ शिंदे खास विमानाने येणार असल्याची चर्चा सुरु आहे पण शिंदे यांनी अजून तरी राज्यपालांची वेळ घेतलेली नाही असे समजते.