राष्ट्रपतीपदासाठी भाजप कडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी

भाजपने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली असून मंगळवारी भाजप अध्यक्ष जे पी नद्डा यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान विरोधी पक्षांनी एकमताने या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांची निवड केली आहे. मात्र राज्ये आणि केंद्रातील एकूण परिस्थिती पाहता द्रौपदी मुर्मू यांचा विजय नक्की मानला जात आहे. मुर्मू विजयी झाल्या तर देशाला पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती मिळणार आहेत. या पदावर आरूढ होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला असतील. यापूर्वी प्रतिभाताई पाटील यांनी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळविला आहे.

द्रौपदी मुर्मू यांनी यापूर्वी २०१५-२१ या काळात झारखंडच्या पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. २० जून १९५८ मध्ये भुवनेश्वर येथे जन्मलेल्या द्रौपदी यांनी अतिशय हलाखीत बालपण काढले आहे. त्या पदवीधर आहेत. त्यांना इतिश्री नावाची एक कन्या असून ती विवाहित आहे. मुर्मू यांचे पती हयात नाहीत. त्यांच्या दोन मुलांचेही पूर्वी निधन झाले आहे. मात्र मुलीला शिकविण्यासाठी त्यांनी काही काळ शिक्षिका म्हणून सुद्धा भूमिका बजावली आहे.

२०१३ ते १५ या काळात त्यांनी भाजपा एसटी आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य म्हणून काम केले आहे. त्यापूर्वी त्यांनी २००६ ते २००९ या काळात भाजप एसटी प्रदेश अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पेलली आहे. ओडीसाच्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या आणि २००७ मध्ये त्यांना सर्वश्रेष्ठ आमदार म्हणून नीलकंठ पुरस्कार दिला गेला होता. त्यांनी परिवहन आणि वाणिज्य मंत्री म्हणून काम केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट केले असून त्यात द्रौपदी मुर्मू महान राष्ट्रपती बनतील असे म्हटले आहे. मुर्मू यांनी त्याचे जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले आणि गरीब, दलित यांना सशक्त करण्यात मोठे योगदान दिल्याचे आणि त्यांचा प्रशासकीय अनुभव मोठा असल्याचे यात म्हटले गेले आहे. ज्या लाखो लोकांनी गरिबी भोगली आहे आणि अनेक अडचणींचा सामना केला आहे त्यांना मुर्मू यांचा जीवन संघर्ष मोठी प्रेरणा देईल असेही मोदी या ट्वीट मध्ये म्हणतात.

राष्ट्रपतीपद उमेदवारी मिळाल्याचे वृत्त द्रौपदी मुर्मू यांना नद्डा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांचे नाव जाहीर केले तेव्हाच समजले. त्या म्हणतात,’ मला खूप आश्चर्य वाटलेच पण आनंद सुद्धा झाला. या बातमीची मी कधी कल्पना केली नव्हती.’ आदिवासी महिलेला उमेदवारी देऊन भाजपने सबका साथ, सबका विकास यांचे उदाहरण पेश केले आहे.