या ज्वालामुखीतून वाहतो निळा लाव्हा
ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा त्यातून उसळणाऱ्या लाल पिवळ्या ज्वाला आणि लाल केशरी लाव्हा वाहात असल्याचे अनेक फोटो आपण पाहतो. पण इंडोनिशियाच्या जावा बेटावरील बानयुवांगी रिजेन्सी आणि बोन्डोवोसो रिजन्सीच्या सीमेवर असलेला एक ज्वालामुखी मात्र याला अपवाद आहे. आजकाल हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले असून माउंट हायकिंग साठी येथे हायकर्स येऊ लागले आहेत.
या ज्वालामुखीच्या चार खासियती आहेत. निळा लाव्हा, निळ्या ज्वाळा, आम्लयुक्त सरोवर आणि चौथे म्हणजे या भागात सल्फरच्या खाणीतून होणारे खोदकाम. कावाइजेन असे या ज्वालामुखीचे नाव असून याचा अर्थ निळा लाव्हा असा आहे. १९९९ मध्ये हा शेवटचा फुटला होता. याचे क्रेटर २० किमीचे असून त्यात अनेक ज्वालामुखी आहेत. त्यातील सर्वात धोकादायक आहे गुरुंग मेरापी व्होल्कानो. या ज्वालामुखीतूनच निळ्या ज्वाला आणि निळा लाव्हा येतो. गुरुंग मेरापी यांचा अर्थ आगीचा डोंगर असा आहे.
वैज्ञानिक या भागात सतत संशोधन करत असतात. येथील सरोवरचे पाणी सुद्धा निळे असून येथेच सल्फरच्या खाणी आहेत. हा भाग फार धोकादायक आहे तरीही येथे मोठ्या प्रमाणावर मजूर येतात आणि खाणीतून सल्फर काढले जाते. येथे काम करणाऱ्या मजुरांना दिवसाला हजार रुपये मजुरी दिली जाते. येथील आम्ल सरोवर २०० मीटर खोल असून या पाण्यात सल्फ्युरिक अॅसिडचे प्रमाण अधिक आहे.
येथून वाहणारा निळा लाव्हा हे अनेकांसाठी आकर्षण बनले आहे. असा लाव्हा असणारा हा एकमेव ज्वालामुखी आहे. येथील खाणीतून रोज १४ टन सल्फर काढले जाते असे सांगतात.